मोबाईलऐवजी मूल्यशिक्षणाकडे वळवणारा उपक्रम :महापौर दीपमाला काळे
साईमत जळगाव प्रतिनिधी
आजच्या डिजिटल युगात लहान मुले मोबाईलमध्ये अधिक गुंतलेली दिसतात. अशा परिस्थितीत त्यांना मानवी मूल्ये, सामाजिक जाणीव आणि कलेची ओढ निर्माण करणारे उपक्रम अत्यंत गरजेचे आहेत, असे प्रतिपादन महापौर दीपमाला काळे यांनी केले.
अजिंठा फिल्म सोसायटी जळगाव, बालरंगभूमी परिषद आणि रिफ्लेक्शन फाऊंडेशन संचलित पालकशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘गंमत जंमत’ बालचित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.
पाल्यांसोबत पालकांनाही आपले बालपण पुन्हा अनुभवता यावे, या उद्देशाने शहरातील भाऊंचे उद्यान येथे दि. २४, २५ व २६ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता या तीन दिवसीय बालचित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजिंठा फिल्म सोसायटीच्या विश्वस्त डॉ. श्रद्धा पाटील शुक्ल यांनी केले. उद्घाटनानंतर बोलताना महापौर काळे यांनी या प्रकारचे उपक्रम शहरात सातत्याने राबविल्यास महानगरपालिकेकडून पूर्ण सहकार्य दिले जाईल, असे आश्वासन दिले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनघा गोडबोले यांनी केले तर आभार प्रदर्शन वर्षा उपाध्ये यांनी मानले.
या वेळी व्यासपीठावर अजिंठा फिल्म सोसायटीचे सचिव विनीत जोशी, कोषाध्यक्ष डॉ. संजय हांडे, देवगिरी चित्र साधनेचे प्रांत संयोजक किरण सोहळे, पालकशाळेचे रत्नाकर पाटील, डॉ. विद्या पाटील, शैलेश शिरसाठ तसेच बालरंगभूमी परिषदेचे अध्यक्ष योगेश शुक्ल उपस्थित होते.
उद्घाटनानंतर पहिल्या दिवशी ४थ्या देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलमधील सर्वोत्कृष्ट बालचित्रपट विजेती ‘शाळा सुटली’ तसेच ‘बेबीज डे आउट’ या चित्रपटांचे प्रदर्शन करण्यात आले. या दोन्ही चित्रपटांना विद्यार्थ्यांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.
शहरातील विविध शाळांच्या मुख्याध्यापकांनी, शिक्षकांनी आणि पालकांनी या उपक्रमाचे स्वागत केले असून, अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
