साईमत, धुळे : प्रतिनिधी
तालुक्यातील कापडणे, शिंदखेडा तालुक्यातील वालखेडा आणि साक्री तालुक्यातील बोपखेल येथे झालेल्या तीन वेगवेगळ्या घटनेत तीन जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्या. याप्रकरणी पोलिसात ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. आत्महत्येमागील कारण मात्र समजू शकलेले नाही.
कापडणे गावातील घटना
धुळे तालुक्यातील कापडणे येथील राहुल अशोक पाटील (वय ३०) या तरुणाने त्याच्या राहत्या घरातील छताच्या लाकडी कड्याला सुती दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. घटना लक्षात येताच त्याला लोकांच्या मदतीने खाली उतरवून सोनगीर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. सोनगीर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक महेंद्र वानखेडे करत आहेत.
बालखेडा येथील घटना
शिंदखेडा तालुक्यातील वालखेडा येथे राहणारा नितीन संभाजी पाटील (वय ३५, मूळ रहिवासी बुधगाव, ता. चोपडा) या तरुणाने वालखेडा गावातील बसस्टँडजवळ कंचनपूर रस्त्यावरील राहत्या घरात पंख्याला बेडशीटच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. त्याला नरडाणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी नरडाणा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक गोटीराम पावरा करीत आहेत.
बोपखेल येथील घटना
साक्री तालुक्यातील बोपखेल येथील दिलीप रामदास अहिरराव (वय ६०) या वृध्दाने सुती दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली. घटना लक्षात येताच त्यांना पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केले. तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल पी. यू. सोनवणे करत आहेत.