साईमत जळगाव प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. जळगाव जिल्ह्यात उपजिल्हाधिकारी, तलाठी, तहसीलदार, सरकारी डॉक्टर्स यांना गुंडांकडून धमक्या येणे, मारहाण होणे या घटना वाढत आहेत. या गुंडांमध्ये एवढी हिम्मत आली कुठून ? असा सवाल करीत सत्ताधाऱ्यांचे गुंडांना अभय असल्याचा आरोप भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी केला आहे.
अधिकाऱ्यांवरील मारहाणीचा व धमक्यांचा काँग्रेसतर्फे निषेध करण्यात आला आहे. जिल्ह्यात तिन्ही मंत्री निष्क्रिय असून सत्ताधाऱ्यांमुळेच गुन्हेगार मुजोर होत असल्याचेहि प्रदीप पवार यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांच्यावर हल्ला झाला होता. त्याच्यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर जळगाव तहसीलदार शीतल राजपूत यांच्या वाहनाचाही काही दुचाकीस्वार तरुणांनी पाठलाग केला होता. याबाबतचा विडिओ खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनीच माध्यमांना दिला होता. तसेच, रावेर तालुक्यातही तलाठीला धक्काबुक्की करीत सरकारी कामात अडथळा आणण्यात आला. यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता, वैद्यकीय अधीक्षक यांच्यासह डॉक्टरांना मारहाण करण्याची धमकी देत शिवीगाळ करण्यात आली. या सर्व घटना आता १५ दिवसातल्या आहेत.
या घटनेतून स्पष्ट दिसते की, सरकारी अधिकारीदेखील आता दहशतीत असून किरकोळ गुंडदेखील धमक्या देण्याचे गम्भीर प्रकार करीत आहेत. त्यांच्यावर कुणाचा अंकुश दिसत नाही. जिल्ह्यात तीन मंत्री आहेत. मात्र त्यांचे मौन खूप काही सांगते. या गुंडांना सत्ताधारी पक्षाच्या लोकांचे अभय तर नाही ना असा सवाल जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, जिल्हा सरचिटणीस जमील शेख, यांनी केला आहे. दोषी गुंडांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे. जनतेला असुरक्षित वाटणारे हे सरकार आता सरकारी अधिकाऱ्यांनादेखील असुरक्षित झाले आहे. राज्याचे गृहमंत्री अपयशी ठरले असून त्यांनी राजीनामा दिला पाहिजे असेही जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार म्हणाले.