‘महाराष्ट्रात घाणेरडं राजकारण सुरू, मोदींचा पत्ता सटकला की भाजपचा बंगला कोसळणार’; मनसेप्रमुखांचा ठाण्यातील पत्रकार परिषदेत भाजपला थेट इशारा
साईमत- जळगाव – प्रतिनिधी|
“महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जे काही सुरू आहे ते अत्यंत घाणेरडं आणि भयानक आहे. सध्याच्या परिस्थितीत प्रश्न विकत घेणाऱ्यांचा नाही, तर विकल्या जाणाऱ्यांचा आहे. हे जर देहविक्रीला तयार असतील, तर बाजारात गिऱ्हाईकं तयार आहेतच,” अशा अत्यंत जळजळीत आणि बोचऱ्या शब्दांत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी ठाकरे गटातील फुटीर खासदार आणि आमदारांवर टीकास्त्र सोडले. ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी राज्यातील फोडाफोडीच्या राजकारणाचा खरपूस समाचार घेतला. तसेच, भविष्यात या सगळ्याचे गंभीर परिणाम भाजपलाही भोगावे लागतील, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
तुमच्यातच नवे दुश्मन तयार होतील: राज ठाकरे
महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर जनतेमध्ये तीव्र संताप असल्याचे सांगत राज ठाकरे यांनी भाजपला लक्ष्य केले. ते म्हणाले, “उद्या सत्ता गेल्यावर भाजपलाही या सर्व गोष्टींचा मोठा त्रास सहन करावा लागेल. आपण काय करतोय, कुठपर्यंत जायचं, याला काही मर्यादा आहेत की नाही? ज्या ज्या वेळी जगात एखाद्या सत्ताधाऱ्याने विरोधकांना पूर्णपणे संपवण्याचा प्रयत्न केला, त्या त्या वेळी त्यांच्या स्वतःच्या घरातूनच नवे दुश्मन तयार झाले आहेत. त्यांनीच शेवटी त्यांना संपवले आहे.” हीच प्रक्रिया आता भाजपमध्येही सुरू झाली असून, बाहेरचे विरोधी पक्ष संपवण्याच्या नादात भाजप स्वतःमध्येच विरोधक निर्माण करत असल्याचा दावा त्यांनी केला. यासाठी त्यांनी आणीबाणीच्या काळातील इतिहासाचा दाखलाही दिला.
पत्ता सटकला की भाजपचा बंगला कोसळेल!
भाजपच्या सत्तेच्या संरचनेवर बोलताना राज ठाकरे यांनी ‘पत्त्यांच्या बंगल्याची’ उपमा दिली.
”भाजप हा एका उलटा पत्त्यांचा बंगला आहे. यात सगळ्यात खालचा पत्ता नरेंद्र मोदींचा आहे. तो पत्ता एकदा सटकला की हा संपूर्ण बंगला कोसळून पडेल. तुम्ही मोदी समर्थकांना भक्त म्हणा किंवा काहीही म्हणा, पण आज भाजप फक्त आणि फक्त मोदींवर टिकून आहे, बाकीच्यांवर नाही. आता जे राजकारण तुम्ही खेळताय, ते भविष्यात तुमच्याच अंगाशी येणार आहे.”
— राज ठाकरे, मनसेप्रमुख
सत्तेचा अमरपट्टा कोणीही घेऊन आलेला नाही
राज ठाकरे यांनी निवडणूक प्रक्रियेत सरकारी यंत्रणेच्या वापरावरही बोट ठेवले. पश्चिम बंगाल आणि बिहारच्या निवडणुकांचे उदाहरण देत ते म्हणाले, “बंगालमधून २७ लाख मतं काढली गेली. ममता बॅनर्जींसारख्या मुख्यमंत्र्यांचा पराभव करण्यासाठी मोठी सरकारी यंत्रणा कामाला लावली गेली. देशात सध्या जे घाणेरडं आणि भयानक राजकारण चाललं आहे, त्याचा फटका भविष्यात भाजपला बसेल.”
शेवटी, राजकीय पक्षांना आपण कोणता पायंडा पाडत आहोत याचे भान राहिलेले नाही, अशी खंत व्यक्त करत राज ठाकरे म्हणाले की, सत्तेचा अमरपट्टा कोणीही घेऊन आलेला नसतो. महाराष्ट्रात सध्या सुरू असलेले फोडाफोडीचे राजकारण हे कुठल्याही दृष्टीने उमदं आणि चांगलं राजकारण नाही. अशा राजकारणामुळे पुढच्या पिढ्यांचे काय होणार, अशी चिंताही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
