जळगावमधील भाजपाचा उमेदवार बदलण्याची दाट शक्यता

0
45

साईमत, जळगाव ः प्रतिनिधी

जळगाव लोकसभा मतदार संघातून शिवसेना ठाकरे गटाने पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर भाजपाच्या तंबूत घबराट उडाली आहे. त्याबरोबरच जळगाव लोकसभेचे समीकरण झपाट्याने बदलण्याची चिन्हे दिसू लागल्याने खा.उन्मेष पाटलांचे बंडाला कसे सामोरे जायचे याबाबत भाजपाच्या श्रेष्ठींमध्ये मंथन सुरु झाल्याचे वृत्त आहे. भाजपाच्या गोटात यासंदर्भात जोरदार चर्चा सुरु आहे. पक्षाने उमेदवार बदलविला नाहीतर जळगाव लोकसभा मतदार संघात धक्का बसू शकतो, असा सूर पुढे येत आहे. त्यामुळे गुरुवारी ना.गिरीश महाजन यांनी माजी खासदार ए.टी.नाना पाटील यांच्यात बंदद्वार चर्चा झाल्याचे विश्‍वसनीय गोटातील वृत्त आहे.

यावेळी विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांना डावलून माजी आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी संधी दिली असली तरी त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच भाजपा कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला. मात्र, जिल्ह्यातील पक्षश्रेष्ठींनी त्याची गंभीर दखल घेतली नाही. त्याचा परिपाक विद्यमान खासदार उन्मेष पाटील तसेच पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी हाती मशाल घेण्यात झाला. या घटनेने जिल्हा भाजपात भूकंप झाला असून संकटमोचक ना. गिरीश महाजन अडचणीत आल्याची चर्चा आहे. स्मिता वाघ यांची उमेदवारी कायम राहिल्यास या मतदार संघात भाजपाला धक्का बसू शकतो, असा अंदाज बांधला जाऊ लागला आहे. त्यामुळे स्मिता वाघ यांच्याऐवजी करण पवार यांना कडवी झुंज देऊ शकेल, असा पर्यायी उमेदवार शोधण्यास सुरुवात झाली आहे. त्यादृष्टीने माजी खासदार ए.टी.नाना पाटील यांचा चेहरा समोर आला आहे. त्यादृष्टीनेच गुरुवारी संकटमोचक ना. गिरीष महाजन व ए.टी.नाना पाटील यांच्यात दुपारी बंदद्वार चर्चा झाल्याचे वृत आहे.

बंदद्वार चर्चेबाबतचे वृत्त भाजपा कार्यकर्त्यांसह शहरात पसरताच पुन्हा एकदा उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत स्मिता वाघ यांना प्रथम उमेदवारी जाहीर झाली होती. मात्र, अंतिम क्षणी त्यांचा पत्ता कट करण्यात आला. चाळीसगावचे उन्मेष पाटील यांना संधी देण्यात आली. त्या संधीचे त्यांनी सोन करूनही यंदाच्या भाजपच्या यादीतून त्यांना वगळण्यात आल्यामुळे ते नाराज झाले. त्यांनी पक्षांतर करत भाजपाला धक्का दिला. या धक्क्यातून सावरण्यासाठी जळगाव जिल्हा भाजपाने संकटमोचक गिरीष महाजन यांच्या नेतृत्वाखाली उमेदवार बदलवून ए.टी.नानांचा पर्याय समोर आणला आहे. वरिष्ठ पक्षश्रेष्ठींशी याबाबत सल्लामसलत सुरू असल्याचे वृत्त आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here