साईमत लाईव्ह मलकापूर प्रतिनिधी
तालुक्यातील रणगाव-भालेगाव येथे रात्री ८ वाजेच्या सुमारास दोन तरुणांमधील किरकोळ कारणाचा शाब्दीक वाद विकोपाला गेल्याने एका २८ वर्षीय तरुणाने ३५ वर्षीय तरुणाचा लोखंडी सुरा भोसकत जीवे ठार मारल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून पोलीसात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, मलकापूर तालुक्यातील रणगाव-भालेगाव येथे रात्री ८ वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे ग्रामस्थ भोजन आटोपून चौकात गप्पा मारत असतांना प्रदिप पद्माकर वानखेडे (वय ३५) व अशांत उर्फ कडू अशोक वानखेडे (वय २८) या दोन तरुणांमध्ये कसल्यातरी किरकोळ कारणावरुन शाब्दीक वाद सुरु झाला. हा शाब्दीक वाद शब्दाशब्दाने पुढे जात हुमरीतुमरीवर आला. त्यानंतर दोघे तरुणांचा संयम सुटल्याने वादाचे रुपांतर हाणामारीत झाले.
या हाणामारीत अशांत वानखेडे याने प्रदीप वानखेडे याच्यावर लोखंडी सुरीने सपासप वार करत भोसकून काढले. या घटनेत प्रदीप वानखेडे हा गंभीररित्या जखमी झाला. अत्यावस्थ अवस्थेत प्रदीपला मलकापूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यास उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. उपजिल्हा रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकार्यांनी प्रदीप वानखेडे यास मृत घोषीत केले. याबाबत मलकापूर येथील एमआयडीसी पोलीस स्थानकात अशांत वानखेडे याच्याविरुध्द भादंवि ३०२ व ५०४ अन्वये खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या रक्तरंजित खूनाच्या प्रकरणाने भालेगाव परिसरातील नागरिक प्रचंड हादरले असून परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. या घटनेबाबत नेमके भांडणाचे कारण काय होते? तसेच हा वाद इतका गंभीर होता का? यामधुन खूनासारखा प्रकार घडला याबाबतचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नसून पोलीस तपासाअंती या घटनेचा सविस्तर खुलासा होईल, असे समजते.