साईमत / सोलापूर
सोलापूर जिल्ह्याची ओळख आजवर पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त जिल्हा अशी राहिली आहे. मात्र आता ही ओळख बदलून ‘रक्तरंजित सोलापूर’ अशी भीषण प्रतिमा तयार होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. गेल्या अवघ्या ७२ तासांत जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी सहा निर्घृण खून झाल्याने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. या घटनांमुळे कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू असून पोलीस यंत्रणेवर प्रचंड दबाव निर्माण झाला आहे.
उळेगावात कामगार दिनीच गळा चिरून खून (१ मे) दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळेगाव (शिवाजी नगर) येथे १ मे रोजी संजय विठ्ठल शिंदे (वय ५४) यांचा अज्ञात आरोपींनी गळा चिरून निर्घृण खून केला. घरातच घडलेल्या या घटनेत धारदार शस्त्राने मानेवर खोल वार करण्यात आले होते. कामगार दिनी घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण पसरले.
वैरागमध्ये तरुणाचा दगडाने ठेचून खून (२ मे) बार्शी तालुक्यातील वैराग शहरातील दत्तनगर परिसरात २ मे रोजी दिनेश उर्फ अप्पासाहेब दादासाहेब कापसे (वय ३१) या तरुणाचा डोक्यात दगड घालून अत्यंत क्रूरपणे खून करण्यात आला. भरवस्तीत झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
बोरामणीत तिहेरी हत्याकांड; कुटुंबच संपवले (२ मे रात्री) त्याच दिवशी रात्री दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावात थरारक घटना घडली. एकाच कुटुंबातील तीन जणांची निर्घृण हत्या करण्यात आली. गायत्री सुधाकर मस्के (वय ४२), त्यांची मुलगी प्रिया मस्के (वय १८) आणि मुलगा शिवराज मस्के (वय १६) यांचा मृत्यू झाला. प्राथमिक अंदाजानुसार जमीन वादातून हे हत्याकांड घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सोलापूर शहरात दिवसाढवळ्या हत्या (३ मे) रविवारी सकाळी सोलापूर शहरातील सत्तर फूट रोड परिसरातील माधन नगर येथे पुन्हा एकदा रक्तरंजित घटना घडली. सुरेश कृष्णा श्रीराम (वय ३५, रा. नीलम नगर) यांचा ६ जणांच्या टोळक्याने डोक्यात दगड व कोयत्याने वार करून खून केला. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
