साईमत, फैजपूर : प्रतिनिधी
नाशिक येथील हिरवांकुर फाउंडेशनच्या माध्यमातून न्यायव्यवस्थेला सहभागी करून वृक्ष दत्तक अभियानातून समाजातील प्रत्येक घटकाला प्रेरणा मिळणार आहे. वसुंधरेला हरित अच्छादनातून ग्लोबल वॉर्मिंगच्या महाभयंकर आव्हानातून संपूर्ण मानव जातीच्या बचावाचे कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार रावेर तालुक्याचे कुटुंब प्रमुख म्हणजेच रावेरचे दिवाणी न्या.क. स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग प्रवीण प्रभूलाल यादव यांनी केले. हिरवांकुर फाउंडेशन, नाशिकच्या विद्यार्थी दशेतून हरितसंस्कार याद्वारा ‘हर घर किसान’ संकल्पनेचा यशस्वीपणे शुभारंभ करण्यात आला.
देशातील लोकशाहीच्या चार स्तंभांपैकी मुख्य आधारस्तंभ असलेल्या न्यायव्यवस्थेला सोबत घेऊन येत्या १५ ऑगस्टपासून वृक्षदत्तक अभियान साकारण्याचा मानस हिरवांकुर फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष निलयबाबु शाह यांनी व्यक्त केला. हिरवांकुर टीमचे सदस्य धनाजी नाना महाविद्यालयाचे इंग्रजी विषयाचे प्रा.कॅप्टन डॉ. राजेंद्र राजपूत, समुपदेशिका व जळगाव हिरवांकुर महिला विभागाच्या प्रमुख सोनाली राजपूत, वृक्ष प्रेमी विजय पाटील, शक्तीसिंह सोहनी, डॉ. राजेंद्र आठवले सोबत रावेर बार असोसिएशनचे सचिव ॲड. के.डी.पाटील आदी मान्यवरांनी न्यायाधीशांची भेट घेतली. त्यांचे समक्षही अनमोल व राज्यव्यापी संकल्पना प्रस्तुत केली.
अभियानाअंतर्गत न्यायाधीश यांच्या हस्ते वृक्षारोपण करून न्यायाधीश सोबत न्यायालयातील सर्व विधीज्ञ, सेवकवृंद हे भारतीय प्रजातींच्या वृक्षांचे एक-एक रोप दत्तक घेतील. या बाळरोपाचे संगोपन करतील. संगोपन करणाऱ्या प्रत्येकचे नाव त्या वृक्षाला देण्यात येईल. त्यात विशेषत्वे भारतीय परंपरेतील वड, पिंपळ, निंब, करंज, बहावा, रिठा आदीसारख्या आयुर्वेदिकदृष्ट्या उपयुक्त अशा वृक्षांचे रोपण न्यायालयाच्या आवारात केले जातील. ही वृक्षदत्तक संकल्पना येत्या १५ ऑगस्ट रोजी एकाचवेळी सुमारे ४० पेक्षा अधिक तालुक्यांमध्ये साकारण्यात येणार असल्याचे टिम हिरवांकुरतर्फे सांगण्यात आले.
अभियानासाठी न्या.प्रवीण यादव यांच्यासोबत सीनियर क्लर्क दिनकर इंगळे, नाझर चंदू बिऱ्हाडे, बार असोसिएशनचे अध्यक्ष बी. डी. निळे, सचिव के. डी. पाटील यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभत आहे.
अभियानाला साथ देण्याचे आवाहन
उपक्रम अत्यंत क्रांतिकारी व प्रभावशाली आहे. समाजातील निसर्गप्रेमीजनांनी अभियानाला साथ द्यावी, असे आवाहन हिरवांकुर फाउंडेशनचे अध्यक्ष निलयबाबू शाह, ग्रीन सिटी फाउंडेशन जळगावचे संस्थापक-अध्यक्ष विजय वाणी तसेच सामाजिक वनीकरण जळगावचे डी. एफ. ओ. संजय पाटील यांनी केले. अभियानाला यशस्वी करू जिल्ह्यात आदर्श प्रस्तुत करण्यासाठी न्यायालयातील विधीज्ञ, सेवकवृंद अत्यंत उत्साहाने परिश्रम घेत आहेत. यासोबतच रेन वॉटर हार्वेस्टिंग व कंपोस्टचे युनिट तयार करण्याचा प्रयत्न करू, असे न्यायालयातील उपस्थितांनी ग्वाही दिली.
