आमदारांनी स्वखर्चातून दुरावस्थेतील कायम दुर्लक्षित शेतरस्ते लावले मार्गी

0
38

११० कि.मी.च्या रस्त्यांसाठी चार कोटी; शेतकऱ्यांमध्ये प्रचंड समाधान

साईमत/विशेष प्रतिनिधी/जळगाव

एखाद्या लोकप्रतिनिधीला काम सांगताच ते कामच झाले आणि समस्या मार्गी लागली, असे उदाहरण सद्याच्या अस्थिर राजकारणामुळे दुर्मिळ म्हटले पाहिजे. पण लोकांच्या विश्वासाला खरे उतरून कायम दुर्लक्षित व अत्यंत दुरावस्था झालेल्या सुमारे ११० कि.मी. लांबीच्या शेतरस्त्यांसाठी आ. चंद्रकांतभाऊ पाटील यांनी मनावर घेत शासनाच्या मदतीशिवाय मुक्ताईनगर मतदारसंघातील शेतकऱ्यांना सुलभता यावी म्हणून तब्बल चार कोटी रुपये स्वतः खिशातून खर्च करून शेतरस्ते दुरुस्तीचा धडाका लावून एक नवीन पायंडा पाडला आहे. आमदारांच्या अशा निर्णयामुळे रावेर, मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यातील शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील रावेर, मुक्ताईनगर तालुक्यात प्रामुख्याने केळी उत्पादक शेतकरी व शेती आहे. केळी वाहतुकीला अडचणी निर्माण होऊन केळी शेती तोट्यात जाण्यास शेतीच्या रस्त्यांची अत्यंत बिकट अवस्था कारणीभूत असल्याचे लक्षात घेऊन आ.चंद्रकांतभाऊ पाटील यांनी स्वतःची यंत्रणा कामाला लावून ‘मागेल त्याला शेतरस्ता’ मोहीमच स्वखर्चातून राबविली. त्यांनी मतदार संघातील जवळजवळ दीडशे ते दोनशे शेती रस्ते स्वखर्चातून करण्याचा विडा उचलला आहे. मुक्ताईनगर मतदार संघातील सुमारे ११० कि.मी. रस्त्यांची कामे पूर्णत्वास आली आहेत. एखादी राजकीय व्यक्ती मतदार संघातील विकास कामे आपल्या खिशातील पैशांनी करीत आहेत, ही बाब
जळगाव जिल्ह्यात पॅटर्न म्हटली पाहिजे. यामुळे आ.चंद्रकांतभाऊ पाटील यांच्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत जिव्हाळ्याच्या असलेल्या कामाचा मार्ग लावला म्हणून संपूर्ण मतदारसंघात कौतुक होत असून शेतकऱ्यांतून आनंद व्यक्त केला जात आहे.

यंत्रणेकडून तात्काळ निपटारा अन्‌ रस्ता होतोय तयार

मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील सुमारे दीडशे ते दोनशे शेती रस्ते पूर्णत्वास आणण्यासाठी पंधरा ते वीस ट्रॅक्टर १८ डंपर्स, आठ ते दहा जेसीबी मशीन अशी मोठी वाहने २४ तास कार्यरत आहेत. या माध्यमातून मुरुमाचे दीर्घकाळ टिकतील असे शेती रस्ते करण्यात येत आहेत. रावेर तालुक्यातील तासखेडा, उदळी, गहूखेडा, रणगाव, रायपूर, सुतगाव, ऐनपूर, कोचुर, खिर्डी, लहान वाघोदे, मोठे वाघोदे, धामोडी व इतर अशा गावांमध्ये त्यासोबतच मुक्ताईनगर तालुक्यातील चिंचोल, चांगदेव, मेहुण वढवे हरताळे, लोहारखेडा, अंतुर्ली, बेलसवाडी, उचंदा सुकळी, महालखेडा, भोटा, नायगाव, सातोड, ढोरमाळ, माळेगाव, तरोडा, घोडसगाव येथील गावांमध्ये आतापर्यंत शेती रस्त्यांची कामे पूर्ण केली आहेत.

शेतरस्ते तयार करून दिले जाणार

बोदवड तालुक्यातील काही शेती रस्त्यांची कामेही पूर्ण करण्यास सुरुवात झालेली आहे. खिर्डी शिवाराला जोडून रावेर विधानसभा मतदारसंघातील निंभोरा व विवरा गावातील काही शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन तेथील शेतरस्ते तयार करून दिले जाणार आहेत. आ.चंद्रकांतभाऊ पाटील यांच्या आदेशाने स्वखर्चातून शेतरस्ते करतांना स्वीय सहाय्यक प्रवीण चौधरी, तुषार बोरसे, सुनील पाटील, महेंद्र मोंढाळे आदी पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.

विकासाचा अनुशेष भरून काढला जातोय

गेल्या तीस वर्षाच्या मुक्ताईनगर मतदारसंघातील विकासाचा अनुशेष भरून काढण्यात येत आहे. मतदारसंघातील शेतजमीन ही काळीशार असल्याने शेतात जाणारे गाडरस्ते पावसाळ्यात चिखल व दलदलयुक्त होतात. त्यातच अवजड वाहतुकीमुळे रस्त्यांना खोल चाकोऱ्या पडतात. त्यामुळे शेतात येणे-जाणे तसेच शेतातील पिके उत्पादन बाजारापर्यंत पोहोचविण्यासाठी वाहन शेतापर्यंत आणण्याच्या वर्षानुवर्ष असलेल्या समस्येवर तोडगा म्हणून शेती रस्त्यांच्या कामाला प्राधान्य देऊन स्वतंत्र मनुष्यबळ आणि मोठ्या यंत्रसामुग्रीच्या माध्यमातून रावेर व मुक्ताईनगर तालुक्यातील रस्त्यांची कामे मार्गी लावली आहेत.

-आ.चंद्रकांतभाऊ पाटील
मुक्ताईनगर, मतदारसंघ

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here