मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळावे

0
1

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळावे, केंद्रात आणि राज्यात एकाच विचाराचे सरकार असल्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा, मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ओबीसीप्रमाणे तात्काळ सवलती द्या, जे १०० टक्के राज्य सरकारच्या अधिकारात आहे. मराठा आरक्षणासाठी झालेल्या आत्तापर्यंतच्या सर्व आंदोलनाचे गुन्हे (आंतरवाली सराटीसह) तात्काळ मागे घ्यावे आदी मागण्यांसाठी सकल मराठा समाज आणि संभाजी सेनेच्यावतीने पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी प्रमोद बापू पाटील, सरपंच गिरीश पाटील, जयसिंग भोसले, भाऊसाहेब पाटील, बाजार समितीचे संचालक राहुल पाटील, तमाल देशमुख, मनोज भोसले, सागर चौधरी, अरुण पाटील यांच्यासह मराठा समाज बांधव उपस्थित होते.

सरकारने मराठा समाजाचा आता अंत पाहू नये, अन्यथा समाजातील तरुणांचा उद्रेक झाला तर आत्तापर्यंत आत्महत्या करून जीव देणाऱ्या तरुणांनी उद्या शासनकर्त्यांचे जीव घेतले तर विशेष वाटून घेऊ नये. शासनाने तात्काळ मराठा समाजाच्या मागण्यांची अंमलबजावणी करून मराठा समाजाला न्याय द्यावा, असा इशारा लक्ष्मण बापू शिरसाठ (पाटील) यांनी दिला आहे.
ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातील मराठा समाजाची सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आणि बिकट झाली आहे. मराठा समाजातील शिक्षित उच्चशिक्षित तरुण-तरुणींना चांगले शिक्षण घेऊन चांगले मार्क्स (गुण), पात्रता असूनही त्यांना त्यांच्या पात्रतेनुसार नोकरी मिळत नाही. मराठा समाजातील तरुण आज अक्षरशः हॉटेलात चहाच्या टपरीवर मिळेल ती पडेल ती कामे करीत आहेत. काही रिक्षा चालवित आहेत तर काही अक्षरशः हमाली करत आहेत.

मराठा समाजातील तरुणींची परिस्थितीही याच्यापेक्षा काही वेगळी नाही. तरुणीही मॉल, कापड दुकाने, विविध वस्तूंचे गाड्यांचे शोरूम अशा ठिकाणी कामे करावे लागत आहेत. एकूणच काय तर मराठा समाज आज पूर्णतः सामजिक आणि आर्थिक मागास झाला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस मराठा समाजातील युवक, युवती वैफल्यग्रस्त होत आहेत. त्यातून आत्महत्या खूप वाढायला लागल्या आहेत. सद्यस्थितीत मराठा समाज आरक्षण नसल्यामुळे दिवसेंदिवस अत्यंत वाईट परिस्थितीचा सामना करीत आहे. त्यामुळे समाजातील युवकांचा प्रक्षोभ आणि आक्रोश दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे ही परिस्थिती तात्काळ थांबावी, अशी मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here