साकेगाव शिवारातील पाणीपुरवठ्याचा विषय प्रचंड गाजला

0
2

साईमत, साकेगाव, ता.भुसावळ : वार्ताहर

येथील ग्रामपंचायतीच्या हद्दीतील भुसावळचा वाढीव भाग असलेल्या सहा कॉलन्यांमध्ये पाणी नसल्यामुळे येथील रहिवाशांचा सोमवारी, १५ एप्रिल रोजी अकरा वाजेपासून ग्रामपंचायतीवर मोर्चा आणण्यात आला होता. यावेळी साकेगाव शिवारातील पाणीपुरवठ्याचा विषय प्रचंड गाजला. याप्रसंगी भुसावळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अर्थात बीडीओ सचिन पानझडे यांनी पाणीपुरवठ्याच्या विषयावर तीन ते चार तास मॅरेथॉन बैठक घेतली.

साकेगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील तसेच साकेगाव व भुसावळच्या सीमा रेषेवर या भागात तब्बल पाच हजार लोकांचा रहिवास आहे. यासाठी साकेगाव ग्रामपंचायतने जलजीवन मिशन अंतर्गत एक ते दीड वर्षापूर्वी साकेगाव येथून विस्तीर्ण भागासाठी एक जलवाहिनी व महालक्ष्मी नगरमध्ये एक जलकुंभ बांधण्यात आला आहे. तेथील रहिवाशांकडून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी काही महिन्यांपूर्वी ३ हजार ३०० रुपये प्रत्येक नळधारकांकडून घेतले होते. त्यानंतर ‘लगेच आम्ही तुम्हाला नळ कनेक्शन सुरु करून देऊ’, असे आश्‍वासन दिले होते. मात्र कित्येक महिने उलटूनही तेथील रहिवाशांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार ग्रामपंचायतमध्ये उघडकीस आला.

यावेळी विरोधी पक्षश्रेष्ठी शकील पटेल यांनी असे निदर्शनास आणून दिले की, ग्रामपंचायतीला कुठलाही भरणा केलेला नाही. त्यामुळे लोकांनी थेट भुसावळचे गटविकास अधिकारी सचिन पानझडे यांना बोलावले होते. त्यानंतर त्यांनी सर्व माहिती समजून घेतली. बारा वाजेपासून आलेले बीडीओ तब्बल तीन ते चार वाजेपर्यंत ग्रामपंचायतमध्ये ठाण मांडून एकेकाची माहिती जाणून घेतली. एक ते दोन कर्मचाऱ्यांना साकेगावच्या प्रभारी ग्रामविकास अधिकारी कांचन बादशहा यांना नोटीस देण्याचे सांगितल्याचे चर्चिले जात आहे. तसेच पैसे का घेतले नाही, ग्रामपंचायतीला भरले नाही, त्याचीही त्यांनी सखोल चौकशी केली. त्यांनी पूर्ण दप्तर चौकशीसाठी भुसावळला बोलाविणार असल्याचे सांगितले.

ग्रामपंचायतीचे किती कर्मचारी आहेत, कोणकोणती कामे करतात, त्याची सविस्तर माहिती त्यांनी जाणून घेतली. तसेच जिथपर्यंत त्यांचा पाणीपुरवठ्याचा प्रश्‍न मार्गी लागत नाही, तिथपर्यंत साकेगाव ग्रामपंचायतीच्या ट्रॅक्टरच्या माध्यमातून तेथील रहिवाशांचा पाणीपुरवठ्याचा प्रश्‍न मार्गी लावला. त्यामुळे तेथील रहिवाशांमधून थोडा का होईना त्यांच्या चेहऱ्यावर आनंद वाहत होता. तसेच रहिवाशांनी सांगितले की, साहेब, आमची इतकी वाईट परिस्थिती आहे की, भुसावळचे नगरसेवक सतीश सपकाळे त्यांच्या माध्यमातून आम्हाला टँकरने पाणीपुरवठा करत असतात. तसेच आम्ही पाणी जपून वापरतो. आम्ही आमचे कपडेही तीन दिवसातून एकदा धुत आहेत, अशा अनेक समस्यांचा पाढाच नागरिकांनी बीडीओंसमोर वाचला.

आनंद ठाकरे, शकील पटेल यांच्यात शाब्दिक चकमक

यावेळी आनंद ठाकरे, शकील पटेल यांच्यात काही वेळ शाब्दिक चकमक झाली होती. तसेच साकेगावचे प्रभारी सरपंच सागर सोनवाल आणि गटविकास अधिकारी सचिन पानझडे यांनी व्यवस्थित मार्ग काढत भुसावळला टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच आठ ते दहा दिवसात एमआयडीसीच्या माध्यमातून पाणी पुरवठा कसा सुरळीत करता येईल. त्याची लवकरच उच्च स्तरावर बैठक घेऊन मार्ग काढण्यात येईल, असेही सांगण्यात आले.

ग्रामस्थांनी वाचला समस्यांचा पाढा

यावेळी भुसावळ वाढीव भागातील ग्रामस्थांसह साकेगावातील ग्रामस्थांनी एकच समस्यांचा पाढा वाचला. काही का होईना गटविकास अधिकाऱ्यांनी वेळात वेळ काढून ग्रामपंचायतीला उपस्थिती देऊन मॅरेथॉन बैठक घेतली. यावेळी भुसावळचे माजी नगरसेवक दीपक धांडे, ग्रा.पं. सदस्य शकील पटेल, आनंद ठाकरे, साकेगाव ग्रामपंचायतीचे कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here