साईमत, पाळधी, ता.धरणगाव : वार्ताहर
राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी महाराष्ट्र दिनी मतदारसंघातील शेतकऱ्यांना जळगाव ते करवीर नगरी म्हणजेच कोल्हापूर अशी ‘हवाई सफर’ घडवून आणली. पालकमंत्र्यांच्या कृतीने शेतकरी भारावले होते. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ पालकमंत्री गुलाबराव पाटील कोल्हापूर, सोलापूर, सांगली दौऱ्यावर आहेत. दौऱ्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या समवेत महायुतीच्या उमेदवारांसाठी ते प्रचार सभा घेणार आहेत.
शेतकरी म्हटला की, बैलगाडी आलीच. त्यांच्यासाठी रेल्वे मोठी गोष्ट आहे. विमानाने हवाई सफर हे तर शेतकऱ्यांसाठी दिवा स्वप्नच आहे. मात्र, शेतकरी पुत्र असलेल्या पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या शेतकऱ्यालाही ‘हवाई सफर’ घडली पाहिजे, अशी इच्छा बाळगून मतदार संघातील काही शेतकऱ्यांना चक्क त्यांनी हवाई सफर घडवली. जळगाव ते करवीर नगरी अर्थात कोल्हापूर विमानाने प्रवास करण्याचा अनुभव पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यामुळे शेतकऱ्यांसाठी संस्मरणीय राहिला. दिवा स्वप्न राहिलेली हवाई सफर सत्यात घडली. धरणगाव तालुक्यातील पथराड येथील गोकुळ लंके, श्रीकांत चव्हाण, गजानन पाटील, प्रवीण पाटील या शेतकऱ्यांना विमानासह हेलिकॉप्टरची ‘हवाई सफर’ पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या दौऱ्यानिमित्त घडली आहे.