राजस्थानमध्ये राहिला राजेशाहीचा दबदबा

0
11

जयपूर : वृत्तसंस्था

यंदाच्या निवडणुकीत राजघराण्यातील सहा सदस्यांनी राजस्थान विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यापैकी पाच सदस्यांनी भाजपाच्या तिकिटावर तर एकाने काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली. यापैकी चारजणांना जनतेने स्वीकारले आहे.
राजस्थानच्या दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या भाजप नेत्या वसुंधरा राजे झालावाडच्या झालरापाटन विधानसभा मतदारसंघातून 52 हजार मतांनी आघाडीवर असून त्यांचा विजय निश्चित आहे.वसुंधरा राजे ग्वाल्हेरची राजकन्या आणि धोलपूरची राणी आहेत.
जयपूरची राजकुमारी आणि भाजपच्या उमेदवार दिया कुमारी यांनी विद्याधर नगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. आतापर्यंतच्या गणनेनुसार दिया कुमारी यांनी काँग्रेसचे उमेदवार सीताराम अग्रवाल यांना 71368 मतांनी मागे टाकले आहे. दिया कुमारी ही महाराजा सवाई सिंह आणि महाराणी पद्मिनी देवी यांची कन्या. 2019 मध्ये राजसमंदमधून लोकसभा निवडणूकही त्यांनी जिंकली.
माजी खासदार आणि बिकानेरचे महाराजा करणी सिंह बहादूर यांची नात सिद्धी कुमारी यांनी भाजपच्या तिकिटावर बिकानेर पूर्व मतदारसंघातून निवडणूक लढवली. आत्तापर्यंत हात आलेल्या कौलनुसार सिद्धी कुमारी काँग्रेसचे उमेदवार यशपाल गेहलोत यांच्यापेक्षा 13 हजारांहून अधिक मतांनी आघाडीवर आहेत. 2008 पासून त्या भाजपच्या तिकिटावर बीकानेर पूर्व मतदारसंघातून सातत्याने निवडणूक जिंकत आहेत.
कोटाचे महाराज इज्यराज सिंह यांच्या पत्नी कल्पना देवी लाडपुरा मतदारसंघातून 25 हजार मतांनी आघाडीवर आहेत. 2018 मध्ये कल्पना देवी यांनी भाजपच्या तिकिटावर पहिल्यांदा निवडणूक लढवली होती आणि एक लाखाहून अधिक मतांनी विजयी झाल्या होत्या.
महाराणा प्रताप यांचे वंशज विश्वराज सिंह मेवाड यांनीही भाजपच्या तिकिटावर नाथद्वारा मतदारसंघातून निवडणूक लढवली. सध्या ते काँग्रेसचे उमेदवार डॉ. राजकुमार शर्मा यांच्यावर सुमारे आठ हजार मतांनी आघाडीवर आहेत. विश्वराज सिंह यांचे वडील महेंद्र सिंह मेवाड हे देखील 1989 मध्ये चित्तौडगडमधून भाजपचे खासदार होते.
भरतपूरचे शेवटचे शासक ब्रिजेंद्र सिंह यांचे पुत्र विश्वेंद्र सिंह यांनी कांँग्रेसच्या तिकीटावर दीग-कुम्हेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या जागेवरून भाजपचे उमेदवार डॉ. शैलेश सिंह हे विश्वेंद्र सिंहपेक्षा आठ हजारांहून अधिक मतांनी आघाडीवर आहेत. विश्वेंद्र सिंह हे 1999 ते 2004 दरम्यान भाजपच्या तिकीटावर तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. भाजपा सरकारमध्ये ते दोनदा केंद्रीय मंत्रीही होते. 2008 मध्ये त्यांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2013 आणि 2018 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर सलग निवडणुका जिंकल्या. गेहलोत सरकारमध्ये ते मंत्रीही होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here