मुक्ताईनगरचे शेख असगर यांच्या मृत्यूची चौकशी करुन कुटुंबाला न्याय द्यावा

0
2

साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी

येथील सीड फार्म भागातील रहिवासी शेख असगर शेख अकबर यांच्या मृत्यूची सीआयडीमार्फत चौकशी करुन त्यांच्या कुटुंबीयांना न्याय द्यावा, अशी आशयाची मागणी तालुका मुस्लिम मणियार बिरादरीतर्फे मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सविस्तर असे की, येथील शेख असगर शेख अकबर हे त्यांच्या दोन मुले आणि आई-वडिलांसह सीड फार्म भागात वास्तव्यास होते. तसेच गेल्या चार-पाच महिन्यांपासून ते पंचायत समितीत महिला व बाल संगोपन विभागात कंत्राटी बेसवर नोकरी करून आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. नेहमीप्रमाणे १ मार्च २०२४ रोजी शेख असगर हे आपली गाडी व बॅग घेऊन कामावर जातो, असे घरी सांगून गेले होते. परंतु शेख असगर कामावर पोहोचलेच नाही किंवा त्यांचा कुणाशीही संपर्क झाला नाही किंवा दिवसभरात ते कुणालाही भेटले अथवा दिसले नाही. त्यानंतर २ मार्च २०२४ रोजी त्यांचा मृतदेह आणि त्यांची मोटरसायकल कुऱ्हा रस्त्यावरील डोलारखेड गावाजवळ पहाटे सुमारे साडेपाच वाजता रस्त्याने जाणाऱ्यांना दिसली. त्यांनी लागलीच त्यांचे फोटो व्हॉट्सॲपद्वारे ग्रुपवर टाकले. त्यामुळे या प्रकरणाची माहिती त्यांच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचली. घटनास्थळ पाहता त्याठिकाणी कुठलेही अपघात झाल्याचे दिसत नाही. तसेच त्यांच्या गाडीचे कुठेही नुकसान सुद्धा झालेले नाही. म्हणून हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय त्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केल्याने त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आलेला होता.

या घटनेत जर अपघात झालेला असेल तर गाडीचे कुठेही नुकसान का झाले नाही किंवा मयताच्या अंगावरही इतरत्र कुठेही मार लागल्याचे आढळून आलेले नाही. जर अपघात झाला असेल तर त्यांनी घरून सोबत नेलेली त्यांची ऑफिसची बॅग त्याच ठिकाणी मिळायला हवी होती. परंतु अद्यापपर्यंत त्यांची बॅगही मिळून आलेली नाही. त्यांचा मोबाईलही त्यांच्या घरी त्यांच्याच खिशात मिळून येणे मग ते कामावर जात असताना किंवा कोणीही व्यक्ती घराच्या बाहेर पडत असताना मोबाईल हा सोबत घेतल्याशिवाय घराबाहेर पडत नाही. शेख असगर बहुतांश काम हे मोबाईलवरून लोकांची कागदपत्रे ऑनलाईन करत होते. त्यामुळे त्यांचा मोबाईल घरी विसरणे शक्य नाही. शेख असगर यांचा मृतदेह ज्या परिसरात मिळून आलेला आहे त्या ठिकाणी ते का गेले असावे? त्यांचा अपघातच झालेला आहे किंवा घातपात झालेला आहे हे अद्याप पोलिसांकडून स्पष्टपणे माहिती मिळू शकलेली नाही. या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी होऊन मृताच्या नातेवाईकांना न्याय मिळावा, अशी मागणी निवेदनात नमूद केली आहे.

निवेदन देतेवेळी मुस्लिम मणियार बिरादरीचे जिल्हा उपाध्यक्ष हकिम आर.चौधरी, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे शे.इरफान शेख इस्माईल, मणियार मशिदचे मुत्तवल्ली कलीम मणियार, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे तालुकाध्यक्ष इमरान बागवान, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे उपाध्यक्ष शेख जाकीर शेख जाबीर, मृत शेख असगरचे वडील शेख अकबर शे.याकुब, शेख शब्बीर शेख, शकुर शेख, हसन शेख अय्युब, पत्रकार अतीक खान, शेख अरमान शेख कादर, शेख अजिज शेख मुसा, पंकज तायडे, शेख एजाज शेख फयाज, शेख अहमद ठेकेदार, यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here