राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज महत्त्वाच्या दौऱ्यानिमित्त जळगावमध्ये दाखल झाले
साईमत जळगाव प्रतिनिधी
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज महत्त्वाच्या दौऱ्यानिमित्त जळगावमध्ये दाखल झाले. शिरपूर येथून हेलिकॉप्टरने त्यांनी जळगाव विमानतळावर आगमन केले. त्यांच्या आगमनावेळी जिल्हा प्रशासनाच्या वतीने उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
या स्वागत सोहळ्याची विशेष बाब म्हणजे, जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी पारंपरिक पुष्पगुच्छाऐवजी पुस्तक भेट देत मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. या उपक्रमामुळे स्वागताला एक वेगळा आणि अर्थपूर्ण आयाम प्राप्त झाला. ज्ञान आणि वाचनसंस्कृतीला प्रोत्साहन देणाऱ्या या कृतीचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान वातावरण सौहार्दपूर्ण आणि उत्साही होते. या प्रसंगी राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार सुरेश भोळे तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर यांच्यासह स्थानिक प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि काही लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याकडे जिल्ह्यातील विविध विकासकामांच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात असून, त्यांच्या भेटीतून जिल्ह्याच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
