पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यासाठी प्रशासनाला वेळ मिळेना !

0
23

जिल्हा प्रशासनाकडे अहवाल सादर केलेला नाही

साईमत/अमळनेर/प्रतिनिधी

तालुक्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या मुसळधार व सततच्या पावसाने नुकसान झालेल्या पिकांचा पंचनाम्याचा अहवालच अद्यापही जिल्हा प्रशासनाकडे सादर केलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत कशी मिळणार?, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

तालुका प्रशासन निवडणुकांच्या कामात तर पुढारी उमेदवारीत व्यस्त असल्याने ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पिकांच्या नुकसानीचा पंचनामा झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचा पंचनामा कोण करेल? शासन दरबारी शेतकऱ्यांनी निवेदन, धरणे आंदोलन करूनही शासन कुंभकर्णी झोप घेत असेल तर भारतासारख्या कृषी प्रधान देशात जगाचा पोशिंदा वाऱ्यावर पडला असल्याची बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.

ऑक्टोबर महिन्यात मुसळधार पावसाने कापणीला आलेल्या पिकांचे नुकसान होऊनही दखल अद्यापपावेतो घेतली गेलेली नाही. २ ऑक्टोबर ते २० ऑकटोबर या दरम्यान तालुक्यात चार वेळा मुसळधार पाऊस झाला. मका, ज्वारी, सोयाबीन ही पिके कापणीला तर कापूस वेचणीला आला असताना शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला गेला. यावर्षी सुरुवातीपासूनच मुसळधार पावसाला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागले.

परिणामी उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशी परिस्थिती असताना आह, त्या परिस्थितीत पिके सावरण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला होता. पिके घरात येण्याच्या वेळेस पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. शेतकऱ्यांनी सर्व नुकसानग्रस्त पिकांचा सरसकट पंचनामा करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. मात्र, निवडणुका जवळ आल्याने लोकशाहीत शेतकऱ्यांना न्याय मिळेल की नाही? असाही प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

सरसकट पंचनामा करण्याची मागणी

शेतात पंचनाम्यासाठी अधिकारी बांधावर पोहोचला नाही. परिणामी जोपर्यंत पंचनामा करणारा अधिकारी शेताच्या बांधावर पोहचत नाही तोपर्यन्त पीक कापणी व कापूस वेचणी करायची नाही का ? असाही प्रश्न पडला आहे. पावसाची उघडीप झाली आहे. आहे त्या परिस्थितीत शेतकरी पिके काढणीला लागले आहेत. मात्र, कुणीही पहायला तयार नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. पंचनामे करण्यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांमध्येच एक वाक्यता नसून सर्वसामान्य शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये, यासाठी सरसकट पंचनामा करण्यात यावा, अशीही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे होणार

प्रशासनाने पंचनाम्याचे आदेश दिले आहेत. तालुक्यात मंडळ व गावनिहाय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. त्यांचेच पंचनामे केले जातील, असे तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here