अपघातग्रस्त महिलेला स्वतःच्या कारमध्ये हॉस्पिटलला नेऊन वाचविले प्राण

0
2

साईमत, यावल : प्रतिनिधी

अंकलेश्‍वर-बऱ्हाणपूर राष्ट्रीय मार्गावर सावदा येथून बऱ्हाणपूरकडे जात असतांना शनिवारी, २५ मे रोजी दुपारी प्रवासी वाहतूक करणारी एक ॲपेरिक्षा रस्त्यात अचानक उलटली. हा अपघात वडगाव रस्त्यावर झाला. अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली होती. महिलेसोबत एक २ वर्षीय बाळ व एक ७ वर्षीय मुलगी होती. योगायोगाने यावेळी याच मार्गावरून यावल येथील आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे हे आपल्या कामानिमित्त जात होते. अपघात झाल्याचे त्यांना दिसल्याबरोबर त्यांनी आपले वाहन थांबवून आपल्या स्वतःच्या वाहनांमध्ये त्या जखमी महिलेस तात्काळ बसवून रावेर ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करून (शासकीय वैद्यकीय सेवेचा अनुभव असल्याने) त्यांनी स्वतःच त्या महिलेवर उपचार सुरू केले. माणुसकी दाखवीत जखमी महिलेचे प्राण वाचविले. अपघात झाल्यानंतर ॲपेरिक्षा चालक हा मात्र घटनास्थळावरून फरार झाला आहे.

अंकलेश्‍वर – बऱ्हाणपूर राज्य मार्गावर सावदा येथून प्रवासी घेऊन एक अज्ञात ॲपेरिक्षा चालक ॲपेरिक्षा (क्र.एम. एच.१९ बी.जे. ५२८५) घेऊन बऱ्हाणपूरकडे जात होता. दरम्यान, वडगाव ते विवरे रस्त्यावर रिक्षा अनियंत्रित झाली. रस्त्यावर कलंडली. या अपघातात दीपाली पांडव (रा.बऱ्हाणपूर) ही महिला गंभीर जखमी झाली. इतर काही जणांना किरकोळ दुखापत झाली. अपघात झाल्यानंतर यावल येथील आशय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. कुंदन फेगडे जात होते. त्यांनी स्वतःचे वाहन थांबविले. त्यांनी जखमींना त्यांच्या वाहनात बसविले व तेथून रावेर ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले.

ही सामाजिक सेवा आणि समय सूचकता दाखवित अपघातग्रस्तांना तात्काळ वैद्यकीय मदत करून अपघातग्रस्त महिलेचे प्राण वाचविल्याबाबत डॉ.कुंदन फेगडे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here