गणेशवाडी परिसरात १० लाखांची गाडी लंपास; पोलिसांकडून तपास सुरू
साईमत/ जळगाव / प्रतिनिधी
शहरातील गणेशवाडी परिसरात धाडसी कार चोरीची घटना समोर आली असून घराबाहेर उभी असलेली सुमारे १० लाख रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची ‘महिंद्रा थार’ अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकारामुळे वाहनधारकांमध्ये चिंतेची लाट उसळली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अभिषेक राजेश शर्मा (वय ३५, व्यवसाय – कॉन्ट्रॅक्टर) हे गणेशवाडी येथील प्लॉट क्रमांक १, शुभम टेंट हाऊसजवळ वास्तव्यास आहेत. त्यांनी ३ मे २०२६ रोजी रात्री सुमारे १० वाजता आपली ‘महिंद्रा थार’ (क्र. MH-19-EP-9495) घरासमोर उभी करून ठेवली होती. मात्र, ४ मे रोजी सकाळी ८ वाजता उठून पाहिले असता गाडी जागेवर नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी ही कार चोरून नेल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच शर्मा यांनी तत्काळ एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली.
या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून चोरीला गेलेल्या वाहनाची किंमत सुमारे १० लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार विजयसिंग पाटील करीत आहेत.
दरम्यान, वाढत्या वाहन चोरीच्या घटनांमुळे नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जात असून पोलिसांनीही गस्त वाढविण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
