गिरणा नदीपात्रात पोलिसांचा सापळा
साईमत/धरणगाव / प्रतिनिधी :
जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला असून, धरणगाव पोलिसांनी गुरुवारी मोठी कारवाई करत एका संशयिताला गावठी बनावटीच्या पिस्टलसह जेरबंद केले. गिरणा नदीपात्रात संशयास्पद हालचाली करत असलेल्या इसमाची झडती घेतल्यानंतर ही कारवाई उघडकीस आली. पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे २५ हजार रुपये किमतीचे मॅगझीनसह गावठी पिस्टल जप्त केले आहे.
जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना अवैध आणि घातक शस्त्रांविरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर धरणगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सुनील पवार यांनी आपल्या पथकाला गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांवर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले होते.
गुरुवार, १४ मे २०२६ रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास पाळधी पोलीस दूरक्षेत्राचे सहायक पोलीस निरीक्षक भूषण कोते हे आपल्या पथकासह दोनगाव शिवारातील गिरणा नदीपात्र परिसरात अवैध रेती वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी गस्त घालत होते. याच वेळी नदीपात्रात एक इसम संशयास्पदरीत्या फिरताना पोलिसांच्या निदर्शनास आला. पोलिसांनी त्याला थांबवून चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याच्या हालचाली अधिक संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी अंगझडती घेतली असता त्याच्याकडे गावठी बनावटीचे पिस्टल आणि मॅगझीन आढळून आले.
या प्रकरणी आनंदा बळीराम सपकाळे (वय ३९, रा. आव्हाणे, ता. जळगाव) याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याविरुद्ध धरणगाव पोलीस स्टेशनमध्ये भारतीय हत्यार कायद्यानुसार कलम ३/२५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय बडगुजर करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक सुनील पवार, सहायक पोलीस निरीक्षक भूषण कोते, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय बडगुजर, पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर बाविस्कर, रवींद्र चौधरी, विशाल पाटील आणि त्यांच्या पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी बजावली.
