बुलेट ट्रेन जरूर करा पण त्याआधी लोकल ट्रेन सुधाराव्यात सुप्रिया सुळेंचा मोदी सरकारला सल्ला

0
3

मुंबई : प्रतिनिधी

राज्यातील अलीकडच्या सत्तांतरानंतर ठाणे जिल्ह्यातून बुलेट ट्रेन (Bullet Train)प्रकल्पाला गती मिळत असल्याचे चित्र स्पष्ट होत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी यासाठी वापरला जाणारा निधी मुंबईच्या लोकल ट्रेनसाठी(Local Train) वापरला जावा अशी मागणी मोदी सरकारकडे केलीय. गुरुवारी मुंबईमधील एका कार्यक्रमामध्ये पत्रकारांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी आधी मुंबईची लाइफ लाइन असणाऱ्या लोकल ट्रेनसाठी केंद्राने निधी द्यावा अशी मी केंद्र सरकारकडे विनंती करते, असं म्हणत अप्रत्यक्षपणे बुलेट ट्रेनला विरोध केलाय.

“बुलेट ट्रेनची मागणी कोणीही करत नाहीय. त्याऐवजी जे (मुंबईकर) मागतायत त्याला आधी निधी द्यावा. घाटकोपर आणि संपूर्ण भागातील रेल्वे, तिथलं शौचालये यासारख्या गोष्टी सुधारल्या पाहिजेत. मुंबईची लाइफलाइन समजली जाते ती सुधारा. मुंबईतील रेल्वे व्यवस्था सुधारल्यानंतर करा तुमची बुलेट ट्रेन. आमचा काही विरोध नाही, जरुर करा,” असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना त्यांनी, “महाराष्ट्र आणि मुंबईचे अनेक मह्त्वाचे विषय दुसऱ्या राज्यांमध्ये नेण्याचा प्रयत्न सातत्याने ते करत आहेत. बुलेट ट्रेन करायची असेल तर जरुर करावी पण त्याआधी मुंबईच्या लोकल ट्रेन सुधारल्या पाहिजेत,” असं मत व्यक्त केलं.

ठाणे जिल्ह्यातून बुलेट ट्रेन प्रकल्पाला सुरुवातीपासूनच गती मिळाली आहे. जिल्ह्यातून भूसंपादनाची कामे अंतिम टप्प्यात आली आहे. तर बाधितांचे पुनर्वसनाचे काम गतीने करण्याचे आदेश केंद्र सरकारकडून जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहे. राज्यात शिंदे सरकार सत्तेत आल्यापासून पुन्हा या प्रकल्पाची चर्चा सुरु झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीने मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प महत्त्वाकांक्षी म्हणून ओळखला जातो. मोदी यांनी २०१५ साली या प्रकल्पाची घोषणा केली. परंतु, घोषणा होताच राज्यातील विविध राजकीय पक्षांकडून याला विरोध करण्यात आला. यामुळे हा प्रकल्प घोषणेपासूनच चर्चेत राहिला आहे. मागील ७ वर्षांच्या कालावधीत या प्रकल्पाशी निगडित भूसंपादन तसेच पुनर्वसनाची कामे सुरू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here