कान्ह ललित कला केंद्राचे विद्यार्थी राष्ट्रीय युवक महोत्सवात चमकले

0
2

साईमत जळगाव प्रतिनिधी

खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयातील कान्ह ललित कला केंद्राचे विद्यार्थी लुधियाना (पंजाब) येथील युवक महोत्सवात चमकले. या विद्यार्थ्यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठमार्फत या महोत्सवात सहभागी होण्याची संधी मिळाली होती. यातील यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे यांच्या हस्ते करण्यात आला.

याप्रसंगी मूळजी जेठा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.एन.भारंबे, प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर, ओजस्विनी कला महाविद्यायाचे प्राचार्य मिलन भामरे यांच्या मुख्य उपस्थितीत करण्यात आला.
पँशन, स्किल व नॉलेज यांच्या त्रिवेणी संगमातून उत्तम करिअर घडवता येते. कला क्षेत्रात खूप मोठी संधी आहे. या आवडीच्या क्षेत्रात जास्तीत जास्त ज्ञान विकसित करून यशाचे शिखर गाठा, अशा शुभेच्छा संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे यांनी विद्यार्थ्यांना दिल्या.
लुधियाना येथील पंजाब कृषी विद्यापीठात झालेल्या ३७ व्या आंतर विद्यापीठ राष्ट्रीय युवक महोत्सवात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला ललित कला प्रकारात दोन सुवर्ण, एक कांस्य पदक प्राप्त झाले आहे. तसेच विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक पथसंचलनात चौथ्या क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले. ललित कला प्रकारात क्ले मॉडेलिंगमध्ये देवा सपकाळे या विद्यार्थ्याला सुवर्ण पदक प्राप्त झाले. इंस्टॉलेशनमध्येही सुवर्ण पदक मिळाले. यात देवा सपकाळे, तोसिफ शेख व माधुरी बडगुजर या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. स्पॉट फोटोग्राफीमध्ये समय चौधरी या विद्यार्थ्याला कांस्य पदक मिळाले. या संघासोबत संघ व्यवस्थापक म्हणून डॉ.योगिता चौधरी (गरुड महाविद्यालय, शेंदुर्णी) आणि प्रा. पीयूष बडगुजर सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here