रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये रंगले चिमुकल्यांचे“ग्रॅज्युएशन सेरेमनी”

0
2

साईमत जळगाव प्रतिनिधी

जी. एच. रायसोनी इस्टीट्युट संचालित सावखेडा‎ येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये प्री-स्कूल व प्री-प्रायमरीच्या लहान विध्यार्थ्यासाठी पदवीदान समारंभ आयोजित करण्यात आला होता. या समारंभात विद्यार्थ्यांना गाऊन व कॅप परिधान करून पदव्या स्वरूपात प्रमाणपत्र देऊन विधीवत गौरवण्यात आले. पूर्व प्राथमिक वर्गाचा अभ्यासक्रम पूर्ण करून प्राथमिक वर्गात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याकरिता ग्रॅज्युएशन सेरेमनी आयोजित करण्यात आली होती.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पूर्व प्राथमिक मधील विद्यार्थ्यांचे सर्व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका तेजल ओझा यांनी केले. यावेळी त्यांनी नमूद केले की, कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीकरिता प्रोत्साहित करणे आहे, असे सांगत जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व शिक्षक वर्ग आणि व्यवस्थापन समिती सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी यु.के.जीच्या ६० विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली. पदवी स्वीकारल्यानंतर चिमुकल्यांनी आपल्या बोलीभाषेत स्वतःचे मनोगत व्यक्त केले. त्यातूनच त्यांच्या शैक्षणिक प्रगतीची माहिती झाली. पालकांनी देखील स्कूलमधील विविध उपक्रमांचे कौतुक केले आणि शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल रायसोनी इस्टीट्युटचे संचालक श्रेयस रायसोनी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी नेहा शिंपी, वैशाली काळे, फातेमा बोहरी व निकिता जैन यासहित सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here