साईमत न्यूज नेटवर्क –
लखनऊ : लखनऊच्या तेजस रुग्णालयात धक्कादायक प्रकार समोर आला असून, उपचारासाठी आलेल्या १९ वर्षीय विद्यार्थिनीवर रुग्णालयातील डॉक्टरनेच अत्याचार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बक्षी तलाव परिसरातील तेजस रुग्णालयात १९ वर्षीय बारावीच्या विद्यार्थिनीला फिट्सच्या त्रासामुळे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तीन दिवसांपूर्वी तिला रुग्णालयात आणण्यात आले होते. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, डॉक्टर विजय कुमार गिरी यांनी ट्यूब टाकण्याचा सल्ला देत तिला ऑपरेशन थिएटरमध्ये नेले.
यावेळी विद्यार्थिनीच्या बहिणीला बाहेर पाठवण्यात आले. पीडितेच्या आरोपानुसार, ऑपरेशन थिएटरमध्ये तिला इंजेक्शन देऊन अर्धवट बेशुद्ध करण्यात आले आणि त्यानंतर डॉक्टरने तिच्यावर अत्याचार केला.
घटनेनंतर शुद्धीवर आल्यानंतर विद्यार्थिनीने कुटुंबीयांना संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर रुग्णालयात गोंधळ निर्माण झाला आणि कुटुंबीयांनी तीव्र संताप व्यक्त केला.
माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले. आरोपी डॉक्टर विजय कुमार गिरी याला ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैद्यकीय अहवाल आल्यानंतर आरोपीवर कठोर कलमांखाली गुन्हा दाखल केला जाणार आहे. पुढील तपास बीकेटी पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.
