राहूल सोलापूरकरच्या अटकेसाठी तीव्र आंदोलनाचा इशारा

0
14

राहूल सोलापूरकरच्या अटकेसाठी
तीव्र आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जळगाव (प्रतिनिधी )

छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत बदनामी कारक वक्तव्य करणाऱ्या राहुल सोलापूरकरवर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांना १० फेब्रुवारीरोजी महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाच्यावतीने सादर करण्यात आले.

राहुल सोलापूरकर नामक अभिनेत्याने छत्रपती शिवाजी महाराज तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्यासंदर्भात बेताल, संदर्भहीन वक्तव्य करून महाराष्ट्रातील अनुयायांच्या भावनांना ठेच पोहोचवली आहे. सोलापूरकर यांनी या महापुरुषांचे कार्य व बुद्धिमत्तेला कमी लेखून अवमान केलेला आहे. सोलापूरकर इतिहासाचे अभ्यासक, संशोधकदेखील नाहीत त्यांनी संदर्भहीन विधाने करून बहुजन समाजाची दिशाभूल केली आहे.

सोलापूरकर यांनी छत्रपती शिवरायांबद्दल कोणताही संदर्भाचा दाखला न देता छत्रपती शिवाजी महाराजांनी लाच देऊन आग्र्यावरून सुटका करून घेतली, असे अत्यंत हीन वक्तव्य केले व पराक्रमी इतिहासाचा अपमान केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतलेल्या पदव्या म्हणजेच त्यांनी केलेलं वेदाचे अध्ययन आहे, बाबासाहेबांच्या विद्वत्तेमुळे ते ब्राह्मणच ठरतात, असे अवमानकारक विधान करून शिवप्रेमी व भीम अनुयायांचा जाणीवपूर्वक अपमान करून सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचा प्रयत्न केला आहे.

या शब्दांचा गांभीर्याने विचार करून राहुल सोलापूरकरविरुद्ध कायदेशीर कारवाई करून अटक केली पाहिजे. अटक न झाल्यास महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदन महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

यावेळी जयसिंग वाघ, प्रा. डॉ. सत्यजित साळवे, विश्वास बि-हाडे, भारत सोनवणे, बापूराव पानपाटील, रमेश सोनवणे, राजू मोरे, महेंद्र केदारे, सोमा भालेराव, अजय बि-हाडे, मनोहर लोखंडे, जगदीश सपकाळे , भाऊराव इंगळे, मनोहर गाडे, विवेक सैंदाणे, दिलीप सपकाळे, पितांबर अहिरे , विजय सुरवाडे , श्रीकांत बाविस्कर, शिरीष‌ अडकमोल , सुभाष सोनवणे , वाल्मीक जाधव यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here