कॉलेज परिसरात वाहतूक पोलिसांची धडक मोहीम २४ अल्पवयीन चालकांवर कारवाई ११९ ई-चलान, १.४७ लाखांचा दंड; पालकांना समज देत वाहतूक शिस्तीचा संदेश
साईमत /जळगाव/ प्रतिनिधी
शहरातील महाविद्यालयीन परिसरात वाढत्या अल्पवयीन वाहनचालकांच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांनी विशेष धडक मोहीम राबवित २४ अल्पवयीन चालकांवर कारवाई केली. या कारवाईदरम्यान वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांविरुद्ध एकूण १ लाख ४७ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून, त्यापैकी ८२ हजार रुपयांचा दंड जागीच वसूल करण्यात आला. या मोहिमेत एकूण ११९ ई-चलानही काढण्यात आल्याने नियमभंग करणाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली.
महाविद्यालयीन परिसरात अल्पवयीन विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर दुचाकी चालवत असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत होत्या. या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी विशेष तपासणी मोहीम हाती घेत वाहनांची कसून पडताळणी केली. कारवाईदरम्यान २४ अल्पवयीन चालक वाहन चालविताना आढळून आले. संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांना पोलिसांनी तातडीने बोलावून घेत त्यांच्या उपस्थितीत वाहतूक नियमांचे महत्त्व समजावून सांगितले. अल्पवयीन मुलांच्या हातात वाहने देताना पालकांनी जबाबदारीने वागावे, अन्यथा गंभीर अपघात घडू शकतात, अशी सूचना यावेळी करण्यात आली.
या मोहिमेत वाहतूक नियमांचे विविध प्रकारे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवरही कठोर कारवाई करण्यात आली. हेल्मेटचा वापर न करणे, आवश्यक कागदपत्रे नसणे तसेच इतर नियमभंगाच्या प्रकरणांमध्ये एकूण १ लाख ४७ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. त्यापैकी ८२ हजार रुपयांचा दंड तात्काळ वसूल करण्यात आला, तर उर्वरित प्रकरणांमध्ये ई-चलानद्वारे दंडाची प्रक्रिया राबविण्यात आली.
ही कारवाई प्रोबेशनरी उपविभागीय पोलिस अधिकारी (डीवायएसपी) सह्याद्री बिरसे आणि प्रशांत दरेकर यांनी वाहतूक शाखेच्या पोलिस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली केली. शहरातील महाविद्यालयीन परिसरात वाहतूक शिस्त राखण्यासाठी अशा प्रकारच्या मोहिमा सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
अल्पवयीनांकडून होणारे बेकायदेशीर वाहनचालन रोखणे, वाहतूक नियमांविषयी जनजागृती करणे आणि संभाव्य अपघात टाळणे हा या विशेष मोहिमेचा प्रमुख उद्देश असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांच्या या कारवाईमुळे महाविद्यालयीन परिसरातील वाहतूक अधिक शिस्तबद्ध होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
