घनकचरा पेटवून संपविण्याचा अजब प्रकार : लाखो रुपयांची बिले मात्र खर्ची

0
2

साईमत, फैजपूर : प्रतिनिधी

शहरातील गेल्या अनेक वर्षापासून गोळा केलेल्या घनकचऱ्यावर लाखो रुपये खर्च करून ओला, सुका, प्लास्टिक पिशव्या, अन्य वस्तूंवर वर्गीकरण करण्याची कोणतीही प्रक्रिया केली जात नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कचऱ्यापासून खत निर्मिती करण्याचा प्रकल्प धूळखात पडलेला आहे. नगरपालिकेने संबंधित कामाचा ठेका दिलेल्या ठेकेदाराला त्याचे कोणतेही ‘सोयर सुतक’ नाही. वर्षभराचा ठेका देऊन महिन्याकाठी लाखो रुपयांची बिले मात्र काढली जात आहे. त्यामुळे ‘तेरी भी चूप अन्‌ मेरी भी चुप’ असा प्रकार सुरु असून जनतेच्या जीवाशी खेळ चालविला आहे. दुसरीकडे घनकचरा पेटवून संपविण्याचा अजब प्रकार समोर आला आहे. त्यासाठी लाखो रुपयांची बिले मात्र खर्ची झाली आहे. दरम्यान, नगरपालिकेने डोळ्यावर पट्टी बांधून काम करण्याची भूमिका घेतली आहे.

सविस्तर असे की, फैजपूर शहराच्या उत्तरेकडील भागात कळमोदा रस्त्याला लागून नगरपालिकेच्या खासगी जागेत फैजपूर शहरातील गोळा केलेला कचरा जमा केला जातो. याठिकाणी त्या कचऱ्यावर कोणतीही प्रक्रिया केली जात नाही. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना त्याचा अतोनात त्रास होतो. त्या परिसरात सतत दुर्गंधी, डास व माशांची उत्पत्ती होत असल्याने शेतकऱ्यांनी अनेकवेळा तक्रारी केल्या. मात्र, त्यांची दखल घेण्यात आली नाही. उलटपक्षी आता हा घनकचरा कित्येक दिवसांपासून हेतूपूरस्कर पेटवून दिला आहे. त्यामुळे परिसरात विषारी धुराचे लोट सतत चोवीस घंटे सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यांचा जीव गुदमरत आहे. तसेच प्रदूषणात वाढ व पर्यावरणाची हानी होत आहे.

जनतेच्या पैशांची लूट थांबवावी

संबंधित ठेकेदार नियम व अटीचे पालन करीत नाही. हे माहिती असूनही नगरपालिका कारवाई करत नाही. दर महिन्याला बिल मात्र अदा केली जातात. हा प्रकार म्हणजे संगनमताने दिवसाढवळ्या नगरपालिकेवर दरोडा टाकण्याचा प्रकार असल्याचे नागरिक चर्चा करु लागले आहे. अशा गंभीर प्रकाराकडे शासनाचा प्रदूषण व पर्यावरण विभाग, जळगाव जिल्हाधिकारी, फैजपूर उपविभागीय अधिकारी यांनी लक्ष घालून पर्यावरणाची होत असलेली हानी व जनतेच्या पैशांची लूट थांबवावी, अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here