राज्यात आजपासून फडणवीस-शिंदे सरकार ; सायंकाळी ७ वाजता शपथविधी?

0
3

मुंबई : वृत्तसंस्था

राज्याचे राजकारण आता वेगळ्या टप्प्यावर येऊन ठेपले आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर केवळ भाजप गोटातच हालचाली वाढल्या असे नाही तर गेल्या १० दिवसांपासून राज्याबाहेर असलेले एकनाथ शिंदे हे देखील झेड सुरक्षा कवचामध्ये मुंबईत पोहचले. मात्र, ते केवळ विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राज्यपालाची भेटच घेणार असे नाही तर देवेंद्र फडणवीस आणि शिंदे हे शपथविधी देखील उरकून घेतील अशी स्थिती आहे. आज सायंकाळी ७ वाजता शपथविधी होण्याची शक्यता आहे. त्यासाठी प्रशासनाकडून राजभवनावर जय्यत तयारी सुरू झाल्याची माहिती पुढे आली आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.

मागील १० दिवसांपासून बंडखोर आमदार हे राज्याबाहेर आहेत. मंत्री पदाला घेऊन कोणामध्ये नाराजी पसरु नये. शिवाय सत्तेचे समीकरण स्पष्ट झाल्यानंतर मंत्री पदाच्या वाटाघाटी सोईस्कर व्हाव्यात म्हणून मुंबईत दाखल झालेले शिंदे हे थेट शपथविधीच उरकतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे काही वेळापुर्वीच राजभवनात दाखल झाले आहे. दोन्ही नेते सागर बंगल्यातून एकाच गाडीतून निघाले होते. त्यांच्यासोबत चंद्रकांत पाटील व भाजपचे इतर नेतेही आहेत. राज्यपालांना भेटून सत्तास्थापनेचा दावा करणार आहेत.

ऐनवेळी कोणती अडचण निर्माण होऊ नये म्हणून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे शपथविधी घेतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. कोण मंत्री, उपमुख्यमंत्री याबाबत त्यांनी सावध भूमिका घेतली असून राज्यपालांची भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन सर्वकाही स्पष्ट करणार असल्याचे फडणवीस आणि शिंदे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here