साईमत जळगाव प्रतिनिधी
शाळा सोडलेल्या विद्यार्थ्यांना,पुन्हा शाळेपर्यंत पोहोचवून त्यांचे शिक्षण पूर्ण करण्याकरता मदत करण्याचा हेतू डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने गणेश चतुर्थीनिमित्त श्री गणेशा शिक्षणाचा योजना प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी जाहीर केली.
यावेळी बोलतांना त्या म्हणाल्या की, या योजनेतंर्गत सद्यपरिस्थितीत मुख्यत्वे करून ग्रामीण भागात वस्त्या पाड्यांमध्ये,,आदिवासी भागामध्ये, गरीब, गरजू, ग्रामीण, शेतकरी, शेतमजूर तसेच अशिक्षित पालकांची मुले व मुली परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहत आहेत. आज कायद्याप्रमाणे शिक्षणाचा अधिकार दिला. तरीही या मुलांच्या आयुष्यामध्ये शिक्षणाला महत्त्व नसते. म्हणून पिढ्यानपिढ्या ते अशिक्षित राहत आपले आयुष्य ओढत असतात. त्यांचे आयुष्य चांगले करायचे असेल, तर त्यांच्या नवीन पिढ्यांना शिक्षण देणे, शिक्षित करणे हेच करे समाजकारण आहे.
यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने श्री गणेशा शिक्षणाचा या योजने शुभारंभ करण्यात आला आहे. या योजनेत प्रत्येक पदाधिकारी महिला आपल्या आजूबाजूच्या,शाळा सोडलेल्या एका विद्यार्थ्याला, शाळेपर्यंत नेऊन त्यांच्या शिक्षण पूर्ण करेल.यासाठी काम करणाऱ्या महिला पदाधिकाऱ्यांचा लेखाजोखा,नेत्यांपर्यंत पोहोचावा म्हणून, प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी एक फॉर्म भरून घेण्यात येईल. ज्यात महिला कार्यकर्ते पदाधिकारी व विद्यार्थी यांची संपूर्ण माहिती असेल.