नवी दिल्ली
दिल्लीतील जंतर-मंतर येथे गेल्या २० दिवसांपासून उपोषणावर बसलेले प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ आणि पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांना शनिवारी (१८ जुलै) सकाळी दिल्ली पोलिसांनी बळजबरीने आंदोलनस्थळावरून हटवून सफदरजंग रुग्णालयात दाखल केले. या कारवाईनंतर वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली जे. आंगमो यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, प्रशासनाला थेट इशारा दिला आहे.
पत्नी गीतांजली जे. आंगमो यांचे प्रशासनाला खडेबोल
सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल केल्याचे समजताच त्यांची पत्नी गीतांजली जे. आंगमो तात्काळ सफदरजंग रुग्णालयात पोहोचल्या. या संपूर्ण प्रकरणावर त्यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत आपली पहिली प्रतिक्रिया दिली.
”मी सध्या दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात आहे, जिथे सोनम वांगचुक यांना दाखल करण्यात आले आहे. माझी, त्यांच्या कुटुंबीयांची आणि गेल्या २० दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून असलेल्या वैयक्तिक डॉक्टरांच्या संमतीशिवाय त्यांना तोंडावाटे (Oral) किंवा नसेद्वारे (Intravenous) कोणतेही औषध किंवा पदार्थ देण्यात येऊ नये.”त्यांनी पुढे सांगितले की, कालपर्यंत (शुक्रवार) त्यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर होती आणि त्यांना अचानक रुग्णालयात आणण्याची कोणतीही वैद्यकीय गरज नव्हती. कलम ३२ अन्वये हा त्यांचा अधिकार असून, रुग्णाच्या किंवा त्यांच्या डॉक्टरांच्या परवानगीशिवाय कोणतीही गोष्ट जबरदस्तीने दिली जाऊ शकत नाही, अशी आठवणही त्यांनी प्रशासनाला करून दिली.
दिल्ली पोलिसांचा बचावात्मक पवित्रा
सोनम वांगचुक यांच्या खालावलेल्या प्रकृतीसंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी होणार होती, त्यापूर्वीच पोलिसांनी जंतर-मंतरवर ही कारवाई केली. या कारवाईवर स्पष्टीकरण देताना दिल्ली पोलिसांनी सांगितले की, “प्रत्येक नागरिकाचा जीव मौल्यवान आहे. न्यायालयाने यापूर्वीच सोनम वांगचुक यांची दररोज वैद्यकीय तपासणी करण्याचे आणि त्यांच्या प्रकृतीवर नियमित देखरेख ठेवून आवश्यक वैद्यकीय मदत पुरवण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसारच ही पावले उचलण्यात आली आहेत.”
आंदोलनाचा भडका; २० जुलैला मोर्चाची घोषणा
पोलिसांच्या या कारवाईनंतर जंतर-मंतरवरील आंदोलनाने आता अधिक आक्रमक रूप घेतले आहे. ‘कॉकरोच जनता पार्टी’चे (सीजेपी) संस्थापक अभिजित दीपके हे आपल्या समर्थकांसह आंदोलनस्थळी पोहोचले असून त्यांनी शनिवारपासून स्वतः उपोषण सुरू करण्याची घोषणा केली आहे. तसेच, सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ आणि पोलिसांच्या हुकूमशाही कारवाईच्या निषेधार्थ २० जुलै रोजी भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याचेही आंदोलकांनी जाहीर केले आहे.
त्यामुळे सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल केले असले, तरी दिल्लीतील आंदोलनाची धग अधिक वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
