अभिजीत दीपके आजपासून आमरण उपोषणावर; २० जुलैला संसदेवर धडकणार मोर्चा
नवी दिल्ली
दिल्लीच्या जंतर-मंतरवर पेपर लीक प्रकरणाविरोधात सुरू असलेले प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ आणि पर्यावरणवादी सोनम वांगचूक यांचे आमरण उपोषण दिल्ली पोलिसांनी अखेर मोडून काढले आहे. दिल्ली हायकोर्टाच्या आदेशाचा दाखला देत पोलिसांनी आज सकाळी वांगचूक यांना बळजबरीने रुग्णालयात दाखल केले. या कारवाईमुळे आंदोलन स्थळी प्रचंड गोंधळ उडाला. या पार्श्वभूमीवर, वांगचूक यांचे सहकारी आणि ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप करत दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत.
सोनम वांगचूक यांना रुग्णालयात हलवल्यानंतर आंदोलनाची धुरा सांभाळत अभिजीत दीपके यांनी थेट केंद्र सरकार आणि प्रशासनाला आव्हान दिले आहे:
१) आजपासून आमरण उपोषण : सोनम वांगचूक यांचे आंदोलन थांबणार नाही, त्यांच्या जागी आजपासून मी स्वतः आमरण उपोषणाला बसत आहे.
२) २० जुलै रोजी संसदेवर मोर्चा : पूर्वनियोजनाप्रमाणे आगामी २० जुलै रोजी जंतर-मंतरवरून संसदेपर्यंत भव्य मोर्चा काढण्यात येईल.
”पोलिसांनी मला मारहाण केली”
दिल्ली पोलिसांनी केलेल्या कारवाईदरम्यान आंदोलन स्थळी मोठा तणाव निर्माण झाला होता. अभिजीत दीपके यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत, “दिल्ली पोलिसांनी कारवाई दरम्यान मला मारहाण केली आणि बेकायदेशीरपणे ताब्यात घेतले,” असा खळबळजनक आरोप केला आहे.
दीपके यांचे जनतेला आवाहन
“मी आजपासून आमरण उपोषण सुरू करत आहे. माझी सर्वांना विनंती आहे की, आता कोणीही मागे हटू नका. प्रशासनाने वांगचूक यांना उठवून मोठी चूक केली आहे, ही चळवळ आता अधिक तीव्र होईल. नागरिकांनी मोठ्या संख्येने जंतर-मंतरवर यावे, २० जुलैला आपण ठरल्याप्रमाणे संसदेवर धडकणार आहोत.”
केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी होते आंदोलन
देशभरात गाजलेल्या पेपर लीक प्रकरणामुळे लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान झाले. या घोटाळ्याला थेट केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना जबाबदार धरत, त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सोनम वांगचूक २८ जूनपासून दिल्लीत आमरण उपोषणाला बसले होते.
वांगचूक यांना वाढता पाठिंबा ठरला कारवाईचे कारण?
गेल्या काही दिवसांत या आंदोलनाला देशभरातून मोठा पाठिंबा मिळत होता. विरोधी पक्षातील अनेक बड्या नेत्यांनी जंतर-मंतरवर जाऊन वांगचूक यांची भेट घेतली होती. तसेच बॉलिवूड आणि सामाजिक क्षेत्रातूनही या आंदोलनाला गती मिळत असल्याने, राजकीय वर्तुळातून दबाव वाढू लागला होता. आज देखील अनेक नेते वांगचूक यांच्या भेटीला येणार होते, तत्पूर्वीच पोलिसांनी ही मोठी कारवाई केली. आता वांगचूक यांच्यानंतर अभिजीत दीपके यांनी आंदोलनाचे हत्यार उपसल्याने दिल्लीतील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे.
