साईमत जळगाव प्रतिनिधी
नुकताच कलादर्श प्रस्तूत,महालक्ष्मी थियेटर्स निर्मित, ‘वेगळं असं काहीतरी ‘ या स्थानिक कलावंतांनी संभाजीराजे नाट्यगृहात सादर केलेल्या नाटकास नाट्य-रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. प्रेक्षकांच्या गर्दीने प्रयोग ‘हाऊसफुल्ल’ होता. नाटकाच्या संन्मानिकांची आगावू नोंदणी झाल्याने नाटक रसिक श्रोत्यांनी तुडुंब भरले होते.
एरवी घरोघरी छोट्या – मोठ्या कारणावरून थेट टोकापर्यंत ताणल्या जाणाऱ्या नवरा-बायकोच्या वादाला ‘ फ्यांटसी ‘ची खमंग फोडणी दिली तर ,त्याची चव काही वेगळीच वाटते ,अशाच शेवटपर्यंत निभावून न्यावयाच्या ‘या’ गोड नात्यावर उपरोधिक पण खुशखुशीत भाष्य करणारे नाटक ‘रतनलाल सी.बाफना ज्वेलर्स’ च्या अनमोल सहकार्याने जळगावकर रसिकांसाठी सादर झाले . प्रारंभी नाट्यगृहाच्या प्रवेशद्वाराशी लागलेल्या हाउस-फुल्ल च्या फलकास आर.सी.बाफना ज्वेलर्स चे जनसंपर्क प्रमुख श्री. मनोहर पाटील यांनी पूजन करून माल्यार्पण केले. निर्मिती प्रमुख हेमंत कुलकर्णी यांनी रतनलाल सी. बाफना कुटुंबियातील श्री. अभयराज चोरडिया यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान केला .नाटकाच्या मध्यंतरात सहभागी कलावंत व तंत्रज्ञ यांना श्री. अभयराजजी चोरडिया व श्री. मनोहर पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले .
वरिष्ठ रंगकर्मी व नाट्यशास्राचे व्यासंगी डॉ.हेमंत कुलकर्णी लिखित,दिग्दर्शित वेगळं अस्स काहीतरी या दोन अंकी नाटकाचा प्रयोगाचे जळगावच्या सांस्कृतिक वाढीसाठी योगदान देणाऱ्या मोजक्या दात्यांपैकी एक ,सुवर्ण-नगरीतील प्रसिद्ध पेढी म्हणून नावलौकिक प्राप्त ,’रतनलाल सी.बाफना ज्वेलर्स यांनी ‘प्रायोजकत्व स्वीकारले .वेगळं अस्स काहीतरी ‘या नाटकात , स्थानिक कलावंत सर्वश्री पद्मनाभ देशपांडे,मंजुषा भिडे,योगेश शुक्ल,दीप्ती बारी,अमोल ठाकूर ,डॉ.श्रद्धा पाटील-शुक्ल आदींचा सहभाग होता . सर्वच कलावंतांनी सहज-सुंदर अभिनयाने व्यावसायिकतेच्या तोडीचा प्रयोग सादरकरून रसिकांची मने जिंकली.
महाराष्ट्र नाट्य स्पर्धा,कामगार नाट्य व औद्योगिक नाट्य स्पर्धेतही या नाटकाचे प्रभावी सादरीकरण झाले आहे . खास रसिकांच्या आग्रहास्तव रतनलाल सी.बाफना ज्वेलर्स प्रायोजित,’वेगळं अस्स काहीतरी ‘या नवरा-बायकोच्या नात्याचं वेगळपण नेमकेपणाने सांगणाऱ्या नाटकास रसिक व बाफना समूहाच्या ग्राहक कुटुंबीयांनी लक्षणीय उपस्थिती देऊन कलावंतांचा उत्साह वाढविला.