तीन दिवसानंतर रोहित पवारांचे अन्नत्याग आंदोलन मागे
शेतकरी कर्जमाफीच्या शासन निर्णयात (GR) सुधारणा करण्यासाठी पंढरपूर येथे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार पक्ष) आमदार रोहित पवार यांचे आमरण उपोषण अखेर स्थगित करण्यात आले आहे. राज्याचे संकटमोचक आणि मंत्री गिरीश महाजन यांनी थेट आंदोलनस्थळी धाव घेत रोहित पवार यांची भेट घेतली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून चर्चा घडवून आणली. या सकारात्मक मध्यस्थीनंतर २२ जूनपूर्वी मुख्यमंत्र्यांसोबत होणाऱ्या निर्णायक बैठकीच्या अटीवर रोहित पवार यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे.
कर्जमाफीच्या जीआरमधील जाचक अटी बदलण्यासाठी रोहित पवार पंढरपुरात उपोषणाला बसले होते, ज्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. हा तिढा सोडवण्यासाठी मंत्री गिरीश महाजन स्वतः आंदोलनस्थळी पोहोचले. त्यांनी रोहित पवारांसमोरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन लावला. मुख्यमंत्र्यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने उच्चस्तरीय बैठकीचे आश्वासन दिले. या आश्वासनानंतर प्रशासकीय आणि राजकीय कोंडी फुटली.
३० जूनपूर्वी जीआरमध्ये आवश्यक बदल होणार: रोहित पवार
आंदोलन स्थगित केल्यानंतर माध्यमांशी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले, “२२ जूनपासून राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्याआधी सरकारसोबत आमची महत्त्वाची बैठक होईल. ३० जूनपासून कर्जमाफी लागू होणार असून, त्यापूर्वीच म्हणजेच ३० जूनपर्यंत जीआरमधील सर्व आवश्यक बदल केले जातील. मुख्यमंत्र्यांसोबत होणाऱ्या या बैठकीत केवळ आम्हीच नाही, तर राजू शेट्टी, अजित नवले, शशिकांत शिंदे, हर्षवर्धन सपकाळ, रविकांत तुपकर, शिवसेना (ठाकरे गट) आणि शेकापचे जयंत पाटील, महादेव जानकर यांच्यासह सर्वच प्रमुख शेतकरी नेते उपस्थित राहून सविस्तर चर्चा करतील.”
रोहित पवारांचा सरकारला इशारा: ‘४ जुलै रोजी मराठवाड्यात मोठे आंदोलन’
आपली भूमिका स्पष्ट करताना रोहित पवार पुढे म्हणाले, “आमच्या दोन छोट्या अटी आहेत. उगाच राजकारण करून उपोषण लांबवायचे नाही आणि शेतकऱ्यांचे नुकसान करायचे नाही म्हणून आम्ही पाऊल मागे घेतले आहे. मात्र, जर या बैठकीत आणि जीआर बदलामध्ये काही गडबड झाली, तर आगामी ४ जुलै रोजी मराठवाड्यात याहून मोठे आंदोलन उभे केले जाईल.” तसेच, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाची दखल घेऊन सरकारने त्यांचीही तातडीने भेट घ्यावी, अशी मागणी पवारांनी यावेळी केली.
शेतकरी अडचणीत असल्याने सरकार सकारात्मक: गिरीश महाजन
रोहित पवारांची भेट घेतल्यानंतर माध्यम प्रतिनिधींशी बोलताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले, “राज्य सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत अत्यंत सकारात्मक आहे. केंद्र आणि राज्य सरकार, म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी राहिले आहेत. शेतकरी वारंवार नैसर्गिक अडचणीत येत असल्यामुळेच सरकारला कर्जमाफी द्यावी लागते. यासोबतच आम्ही शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्नही कायमचा सोडवत आहोत. रोहित पवार यांनी मांडलेल्या मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक बोलावण्यात आली असून, चर्चेतून नक्कीच सकारात्मक तोडगा निघेल.”
