जळगावात २५ जूननंतर मुसळधार पावसाची शक्यता
साईमत /जळगाव/ प्रतिनिधी
मागील काही दिवसांपासून तीव्र उकाडा आणि दमट हवामानामुळे हैराण झालेल्या जळगावकरांना पावसाची आतुरता लागून राहिली आहे. राज्यात मान्सूनने काही भागांत हजेरी लावली असून मुंबईत त्याची अधिकृत एन्ट्री झाल्यानंतर उत्तर महाराष्ट्रातही त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. त्याचाच भाग म्हणून रविवारी पहाटे जळगाव जिल्ह्यातील काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या.
या पावसामुळे काही काळ वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी जिल्ह्यात अद्याप सर्वदूर आणि सातत्यपूर्ण पावसाची प्रतीक्षा कायम आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील तीन दिवस जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून उष्णता आणि दमटपणा यांचे प्रमाण कायम राहणार आहे.
२२ ते २५ जून दरम्यान ढगाळ वातावरणाचा प्रभाव
२२ जून ते २५ जून या कालावधीत जळगाव जिल्ह्यात आकाश अंशतः ते पूर्णतः ढगाळ राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या काळात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या सरी पडू शकतात. मात्र या पावसाला मोठ्या प्रमाणावर स्थिरता नसल्याने दमदार पावसासाठी नागरिकांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.
हवामान तज्ज्ञांच्या मते, २५ जूननंतर मान्सून अधिक सक्रिय होण्याची चिन्हे आहेत आणि त्यानंतर जळगाव जिल्ह्यात पावसाची तीव्रता वाढू शकते. त्यामुळे शेतकरी वर्गासह सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षा पुन्हा एकदा उंचावल्या आहेत.
तापमानाचा चढ-उतार कायम
जिल्ह्यात सध्या ऊन-सावलीचा खेळ सुरू असून तापमानात मोठी घट झालेली नाही. रविवारी जळगावचे कमाल तापमान सुमारे ४०.२ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २७ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. दिवसभर ढगांची उपस्थिती असूनही उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते.
मान्सूनचा वेग मंदावण्यामागची कारणे
हवामान अभ्यासकांच्या मते, सध्या मान्सूनचा मुख्य पट्टा दक्षिण भारतात अधिक सक्रिय असल्याने उत्तर महाराष्ट्रात त्याचा प्रभाव कमी जाणवत आहे. तसेच प्रशांत महासागरातील वातावरणीय बदल आणि पश्चिमी विक्षोभांचा कमी प्रभाव यामुळे मान्सूनची प्रगती काहीशी मंदावली आहे.
पाऊस पडण्यासाठी तापमान, आर्द्रता आणि हवेचा दाब यांचे संतुलन आवश्यक असते. सध्याच्या परिस्थितीत तापमान ३८ ते ४० अंशांच्या आसपास असल्याने हवेतील आर्द्रता पुरेशी नसल्याने पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होत नाही.
तापमान ३४ ते ३५ अंशांच्या खाली आल्यावर आणि आर्द्रता वाढल्यावर मान्सून अधिक सक्रिय होऊन जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता निर्माण होईल, असा हवामान तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्यामुळे आता जळगावकरांचे लक्ष २५ जूननंतरच्या हवामान बदलांकडे लागले आहे.
