परिसरातील नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
साईमत/फैजपूर /प्रतिनिधी :
येथील सामाजिक कार्यकर्ते सिद्धेश्वर वाघुळदे यांनी खंडोबा वाडी, आशिष सराफ नगर आणि लक्ष्मी नगरमध्ये स्वखर्चाने गटारी स्वच्छ करण्याचा पुढाकार घेतला. त्यांनी जेसीबीच्या माध्यमातून गटारीत अडलेल्या सिमेंटच्या पाईप्स काढून गटारी मोकळ्या केल्या. गटारी स्वच्छ करण्यासाठी पालिकेचे कर्मचारी देखील उपस्थित होते. सर्वांच्या समक्ष नागरिकांच्या सोयीसाठी गटारी सफाईचे काम सुरू करण्यात आले, ज्यामुळे परिसरातील नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
शहरातील खंडोबा वाडी, आशिष सराफ नगर आणि लक्ष्मी नगरच्या बाजुंच्या गटारींमध्ये अनेक दिवसांपासून साचलेली घाण नागरिकांसाठी त्रासदायक ठरत होती. गटारीत थांबलेले पाणी, डबके आणि मच्छर यामुळे परिसरात रोगराईच्या भीतीने वातावरण गंभीर झाले होते. पालिकेकडे कर भरणा असूनही या भागातील गटारींची दुरुस्ती होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली होती. सिद्धेश्वर वाघुळदे म्हणाले की, जुना हुंबर्डी रोड आणि खंडोबा रोडवरील गटारींमध्ये स्लोप नसल्यामुळे पाणी योग्य रित्या बाहेर जात नाही. काही घरांचे पाणी जुना हुंबर्डी रोडवर सोडले गेले आहे.
त्यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या भागातील गटारी पूर्णपणे दुरुस्त करण्याची गरज आहे. तसेच, जुना हुंबर्डी रोडवरील इलेक्ट्रिक पोलवर लाईट नसल्यामुळे रात्री अंधारात नागरिक व जनावरांना त्रास सहन करावा लागतो.यावेळी निळकंठ चौधरी, मुकेश कासार, प्रमोद भिरूड, मधुकर कोल्हे, डॉ. दिनकर पाटील, सुनील नमायते, अतुल सरोदे, प्रफुल्ल नेमाडे, किशोर साळुंखे तसेच भाजपाचे शहराध्यक्ष अनंत नेहेते आणि सामाजिक कार्यकर्ते गुट्टू भारंबे यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या भागातील गटारी पूर्णपणे स्वच्छ करून पाण्याचा प्रवाह खंडोबा रोडमार्गे बाहेर काढला जावा, जेणेकरून परिसरातील जीवनमान सुधारेल आणि घाणीचे साम्राज्य संपुष्टात येईल, अशी मागणी नागरिकांतर्फे होत आहे.