पाळधी ते तरसोद बायपासवर ट्रकखाली झोकून मृत्यू
साईमत /जळगाव / प्रतिनिधी
पाळधी ते तरसोद हायवे बायपासवर एका ३० वर्षीय तरुणाने दारूच्या नशेत स्वतःला ट्रकखाली झोकून दिल्याने धक्कादायक घटना घडली आहे. मृतक तरुणाचे नाव विशाल राजेंद्र बाविस्कर (रा. लिंगा, ता. नेपानगर, ह.मु. आसोदा) असे आहे.
घटनेनुसार, विशाल बाविस्कर हा पाळधी ते तरसोद बायपास रस्त्यावर ट्रॅक्टर घेऊन जात असताना समोरून येणाऱ्या टाटा पंच कारशी त्याचा अपघात झाला. या अपघातानंतर, दारूच्या नशेत असलेल्या विशालभोवती नातेवाईक आणि टाटा पंचमधील व्यक्ती जमा झाले होते. सर्वजण त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असताना, अचानक विशालने समोरून येणाऱ्या ट्रक कंटेनरखाली स्वतःला झोकून दिले.
या भीषण घटनेत त्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेमुळे परिसरात खळबळ माजली असून, नातेवाईकांनी जळगाव जिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती.
जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस उपनिरीक्षक विजय देवराम पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक शशिकांत श्रीराम पाटील या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
ही घटना दारूच्या नशेत वाहन चालवण्याच्या धोक्याची गंभीर जाणीव करून देते, तसेच नियोजनबद्ध वाहतूक सुरक्षिततेसाठी सतर्क राहण्याची गरज अधोरेखित करते.
