साईमत / नाशिक
नाशिकमध्ये दिवसाढवळ्या घडलेल्या एका अत्यंत धक्कादायक घटनेमुळे शहर हादरले आहे. नाशिकच्या विल्होळी परिसरात एका तरुणाची भररस्त्यात दगडाने व कोयत्याने सपासप वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात एका महिला आणि एका पुरुषाने मिळून तरुणावर जीवघेणा हल्ला केला. सुरुवातीला तरुणाच्या डोळ्यात मिरची पूड टाकण्यात आली, त्यानंतर त्याला दगडाने ठेचण्यात आले आणि कोयत्याने वार करण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर आरोपी दुचाकीवरून घटनास्थळावरून फरार झाले. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
या हत्येमागचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांनी व्हायरल व्हिडीओ आणि प्रत्यक्षदर्शींच्या माहितीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे.
दिवसाढवळ्या घडलेल्या या थरारक घटनेमुळे नाशिक शहरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
