घटनेनंतर संतप्त नागरिकांकडून आंदोलन व जाळपोळ; पोलिसांचा मोठा बंदोबस्त
साईमत न्यूज नेटवर्क –
बिहारमधील सीतामढी जिल्ह्यात रस्त्याच्या मधोमध एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून विविध ठिकाणी निदर्शने व आंदोलन करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 11 वर्षांच्या पीडित मुलीवर हा प्रकार घडला असून घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे. पीडितेचा आक्रोश ऐकून स्थानिक नागरिकांनी धाव घेतली, मात्र आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला.
या घटनेच्या निषेधार्थ परिसरात संतप्त जमावाने रस्त्यावर उतरून टायर जाळले तसेच काही ठिकाणी भाजी व फळांच्या गाड्यांना आग लावण्यात आली. त्यामुळे परिसरात काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती आणि वाहतूकही विस्कळीत झाली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पीडित मुलीला तातडीने वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलिसांनी घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे जप्त केले आहेत. या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला असून आरोपीच्या शोधासाठी विशेष पथक (SIT) स्थापन करण्यात आले आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी तपास सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
