सक्तीने स्मार्ट मीटर बसवल्यास तीव्र जनआंदोलनाचा इशारा
साईमत -धरणगाव प्रतिनिधी |
महावितरण कंपनीकडून ग्राहकांना विश्वासात न घेता आणि त्यांच्या संमतीशिवाय सक्तीने ‘स्मार्ट वीज मीटर’ बसवले जात असल्याचा आरोप करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने धरणगावात महावितरण कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात तुफान घोषणाबाजी करत परिसरातील नागरिकांनी व शिवसैनिकांनी परिसर परिसर दुमदुमून सोडला.
धरणगाव शहर आणि ग्रामीण भागात सध्या जुने वीज मीटर काढून त्याऐवजी डिजिटल स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम महावितरणकडून वेगाने राबवली जात आहे. मात्र, हे मीटर बसवल्यानंतर ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वाढीव वीजबिले येत असून ही एक प्रकारे सर्वसामान्यांची आर्थिक लूटच आहे, असा थेट आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. नागरिकांवर अन्याय करणारी ही सक्ती तातडीने थांबवण्यात यावी आणि हा निर्णय मागे घेण्यात यावा, अशी आक्रमक मागणी यावेळी करण्यात आली.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या धोरणांवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले.
“महावितरणने नागरिकांच्या इच्छेविरुद्ध किंवा दडपशाही करून स्मार्ट मीटर बसवण्याचा प्रयत्न केल्यास शिवसेना शांत बसणार नाही. सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी उभे राहत यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन उभारले जाईल. त्यानंतर उद्भवणाऱ्या सर्व परिस्थितीची आणि कायदा-सुव्यवस्थेची संपूर्ण जबाबदारी महावितरण प्रशासनाचीच असेल.”
या आंदोलनामुळे काही काळ महावितरण कार्यालयाबाहेर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर आपल्या विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाला सादर करून आंदोलनाची सांगता करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे अनेक स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
