नागपूर : वृत्तसंस्था
रामटेकचे खासदार कृपाल तुमाने शिंदे गटात सहभागी झाले. त्यांनी शुक्रवारी पहिली बैठक घेतली. त्या बैठकीला अडीचशे शिवसैनिक उपस्थित होते. त्यामुळे शिवसेनेते मोठी फूट पडल्याचे दिसून येत आहे. तुमाने यांच्या बैठकीला दोनशेच्यावर शिवसैनिक उपस्थित असल्याने शिवसैनिकांममध्ये अस्वस्थता वाढली आहे. तुमाने यांच्या बैठकीला आम्ही मोजकेच आलो. अनेकांना मुद्दामच निरोप दिले नव्हते. जेवढे बैठकीला आले त्यापेक्षा जास्त बाहेर आहेत, असा दावा समर्थकांनी केला. शिवसेनेत झालेल्या दोन गटामुळे भविष्यात शिवसैनिकांमध्ये मोठा संघर्ष होणार असल्याचे दिसून येते.
दिल्लीहून नागपूरला आल्यानंतर विमानतळावर शिवसैनिकांनी कृपाल तुमाने यांचे स्वागत केले. सोमलवाडा येथे तुमाने यांची बैठक घेण्यात आली. बैठकीला मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. मात्र, रविभवन येथे झालेल्या बैठकीला दीडशेच शिवसैनिक उपस्थित होते. शिवसेनेच्या बैठकीत तुमाने यांना गद्दार ठरवण्यात आले होते. त्यांचा सुबोध मोहिते करू, असा इशाराही देण्यात आला होता.
शिंदेसेनेच्या समर्थकांना बळ देण्यासाठी तुमाने यांची शासकीय समित्या, मंडळावर नियुक्ती केली जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी मोठा निधी देण्याचे आश्वासन दिले आहे. अशा परिस्थितीत शिंदे गटात गेलेल्या शिवसैनिकांना परत आणण्यासाठी शिवसेनेला मोठी कसरत करावी लागणार आहे.