रेल्वे बोर्डाचे निर्देश; २५ शताब्दी गाड्यांमध्ये मोठ्या सुधारणांची अंमलबजावणी
साईमत / नवी दिल्ली
भारतीय रेल्वेने प्रीमियम शताब्दी एक्सप्रेस आणि जन शताब्दी एक्सप्रेस गाड्यांच्या दर्जात मोठी सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांना अधिक आरामदायी, स्वच्छ आणि आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या गाड्यांचा व्यापक कायापालट केला जाणार आहे. दीर्घकाळापासून प्रवाशांकडून येणाऱ्या तक्रारी लक्षात घेऊन प्रवासाचा दर्जा उंचावणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
रेल्वे बोर्डाने सर्व विभागीय रेल्वेला स्पष्ट सूचना देत प्रत्येक रेकची सखोल तपासणी करून ठराविक कालमर्यादेत सुधारणा आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत. या योजनेअंतर्गत गाड्यांमधील आसनव्यवस्थेचे आधुनिकीकरण केले जाणार असून नवीन अपहोल्स्ट्री, स्नॅक टेबल आणि प्रत्येक सीटसाठी यूएसबी चार्जिंग पोर्टची सुविधा उपलब्ध होणार आहे.
याशिवाय, टॉयलेटमध्ये आधुनिक फिटिंग्ज, सुधारित ड्रेनेज प्रणाली आणि उच्च दर्जाची स्वच्छता सुनिश्चित करण्यात येणार आहे. प्रवास अधिक सुखकर व्हावा यासाठी गाड्यांमधील धक्के कमी करण्यासाठी तांत्रिक सुधारणा, व्हेस्टिब्यूल्सची मजबुती आणि एलईडी लाईटिंगची सुधारित व्यवस्था केली जाणार आहे. कोचच्या आतील भागात नवीन फ्लोअरिंग व वॉल पॅनेल्स बसवून आकर्षक रूप दिले जाणार आहे.
सुरक्षेच्या दृष्टीनेही महत्त्वपूर्ण बदल करण्यात येणार असून सीसीटीव्ही कॅमेरे, स्पष्ट सूचना फलक, स्टेशन नावांचे डिजिटल डिस्प्ले आणि प्रगत प्रवासी माहिती प्रणाली (PAPIS) बसवली जाणार आहे. यामुळे प्रवाशांना अचूक व तत्काळ माहिती मिळण्यास मदत होईल.
या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात सुमारे २५ शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा समावेश करण्यात आला आहे. या सुधारणांमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि आरामदायी होईल, तसेच वंदे भारत आणि अमृत भारतसारख्या नव्या सेवांना पूरक वातावरण निर्माण होईल, अशी अपेक्षा रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
