यावलला पाईप लाईनच्या दुरुस्तीसह गटारींच्या कामांमुळे ‘रस्त्याची लागली वाट’

0
2

साईमत, यावल : प्रतिनिधी

शहरातील विकसित भागात कोट्यावधी रुपये खर्च करुन नवीन पाईपलाईन टाकण्यात आली. परंतु ठेकेदार आणि यावल नगरपरिषदेच्या बांधकाम विभागाच्या संगनमताने आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे टाकलेल्या पाईपलाईनचे ठिकठिकाणी बारा वाजल्याने ‘रस्त्याची वाट लागली’ असल्याची स्थिती आहे. त्याठिकाणी पाईपलाईन कायम लिक होत असते. पर्यायी दुरुस्तीसाठी खड्डे खोदल्यानंतर रस्त्याचे ‘बारा वाजले’ आहेत. दरम्यान, नगरपालिका बांधकाम विभाग झोपले आहे का..? असा प्रश्‍न उपस्थित होत असून ‘डोळेझाक’ होत असल्याची ओरड होत आहे.

शहरातील विकसित भागात पांडुरंग सराफ नगरमध्ये शंभर ते दोनशे मीटर अंतरात राजू तडवी, सरोदे सर, साई बॅटरी सर्व्हीसेस यांच्या घराजवळ दोन ठिकाणी आणि त्याआधी फैजपूर रस्त्यावर नगरपरिषदेची पाईपलाईन वारंवार फुटत असल्यामुळे रस्त्याचे १२ वाजले आहेत. त्यात एका ठिकाणी खड्डा खोदल्याने त्याठिकाणी वृक्षारोपण केल्याचेही दिसून येत आहे. परिसरातील राहणाऱ्या नागरिकांना समाजसेवकांना मात्र ‘तोंड दाबुन बुक्क्याचा मार’ सहन करावा लागत आहेे. त्यामुळे नगरपालिकेच्या भोंगळ कारभाराविषयी तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

पाईपलाईन दुरुस्ती झाल्यानंतर किंवा गटारीचे बांधकाम झाल्यानंतर त्या ठिकाणचे आजूबाजूचे बांधकामाचे साहित्य, माती ठेकेदार जागेवरच ठेवत असल्याने आणि ठेकेदाराने व्यवस्थित काम केले आहे किंवा नाही हे यावल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, संबंधित बांधकामाचे अभियंता, बांधकाम विभाग प्रमुख प्रत्यक्ष कामाची पाहणी न करता ठेकेदार सांगेल त्या इस्टिमेटप्रमाणे बील देयक काढून समन्वय साधत असल्याने रहदारीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. काही लोकप्रतिनिधी, काही विविध संघटनाचे प्रतिनिधी यावल शहरातील विविध समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे. यावल नगरपरिषदेच्या कामकाजात सुधारणा होण्यासाठी आता नागरिकांना काय करावे लागेल..? असा प्रश्‍न आता संपूर्ण यावल शहरातून उपस्थित केला जात आहे.

यावल शहरात गंगानगर, तिरुपतीनगर रस्त्यावरील स्वामी समर्थ मंदिराजवळ फक्त १०० मीटर अंतराचा सिमेंट काँक्रीटचा रस्ता बांधकाम केल्यानंतर ठेकेदाराने त्याचठिकाणी बांधकामाचे साहित्य व मिक्सर जागेवरच ठेवल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत असल्याचे सद्यस्थितीला दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here