उपचारादरम्यान ६० वर्षीय दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू, परिसरात हळहळ
साईमत/भुसावळ / प्रतिनिधी :
वरणगाव महामार्गावर बुधवारी (दि. १३) सायंकाळी सुमारे सहा वाजता रुद्रा हॉटेलसमोर घडलेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघातामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मृत व्यक्तीचे नाव सतीष विश्वनाथ बाऊस्कर (वय ६०, रा. चौधरी वाडा, वरणगाव) असे आहे. ते त्यांच्या एमएच १९ सीक्यू ३४१७ क्रमांकाच्या स्कुटीने महामार्गावरून प्रवास करत होते. रुद्रा हॉटेलजवळील तोडलेल्या डिव्हायडरमधून रस्ता ओलांडत असताना समोरून भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
धडकेचा आवाज इतका भीषण होता की परिसरातील नागरिक तत्काळ घटनास्थळी धावून आले. अपघातात बाऊस्कर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती आणि ते रस्त्यावर रक्तबंबाळ अवस्थेत पडले होते. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत करत त्यांना वरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
मात्र प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी Jalgaon येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. दुर्दैवाने उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.
अपघात घडवून धडक देणारे वाहन चालकासह फरार झाले असून पोलिसांकडून अज्ञात वाहनाचा शोध सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून वाहनाचा माग काढण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली आहे.
दरम्यान, घटनास्थळी रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. वेळेत अॅम्ब्युलन्स मिळाली असती तर जखमीचा जीव वाचू शकला असता, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली. तसेच महामार्गावरील तोडलेल्या डिव्हायडरमुळे वारंवार अपघात होत असल्याचा आरोपही स्थानिकांनी केला आहे.
या ठिकाणी तातडीने सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यात याव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. सतीष बाऊस्कर यांच्या पश्चात आई, पत्नी आणि दोन मुली असा परिवार असून त्यांच्या निधनाने संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे.
