साईमत न्यूज नेटवर्क –
पुणे : दौंड तालुक्यातील पाटस येथे भरदुपारी गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ वादातून झालेल्या या प्रकारात 3 ते 4 राऊंड फायर करण्यात आल्याची माहिती मिळाली असून परिसरात काही काळ भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, आज (शुक्रवार) दुपारी सुमारे अडीच वाजता ही घटना घडली. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथून काही तरुण पाटस येथील गरदडे कॉम्प्लेक्स परिसरात आले होते. त्यावेळी स्थानिक तरुणांशी त्यांचा किरकोळ कारणावरून वाद झाला.
या वादाचे रूपांतर सुरुवातीला शाब्दिक चकमक आणि नंतर हाणामारीत झाले. त्यानंतर दगडफेक झाल्याचीही माहिती समोर आली असून यात एका चारचाकी वाहनाचे नुकसान झाले आहे. त्यानंतर अचानक 3 ते 4 राऊंड गोळीबार करण्यात आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली.
घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. मात्र पोलिसांनी तात्काळ कारवाई करत काही संशयित तरुणांना ताब्यात घेतले आहे. त्यांची सध्या कसून चौकशी सुरू आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्यासह पोलिस पथके घटनास्थळी दाखल झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला असून जमाव पांगवण्यात आला आहे.
या गोळीबारामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून सखोल तपास सुरू असून परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.
