तुका म्हणे एक मरणीच सारे उत्तमची उरे कीर्ती मागे ! स्व. सौ. ललिताताई राजेंद्र बलदोटा (वय 57) एक शांत, संयमी, सहनशील, प्रेमळ व्यक्तिमत्त्व 27/4/2023 रोजी संथरा व्रतातून स्वर्गवासी झाले. पती राजेंद्र व मुलगा रोहित यांनी आधुनिक उपचारांनी प्रयत्नाची परकाष्टा करूनही यश आले नाही. मेंदूतील रक्तवाहिनीच्या गाठीनी त्यांना अकाली जावे लागले.त्या देहाने गेल्या परंतु कर्माने मरावे परी कीर्ती रूपाने उरावे या संत युक्तीने अमर झाल्या. पाटोदा जि. बिड येथील किसनलाल संचेती व माता स्व. रामकुवरबाई यांच्या पोटी 19/9/1966 जन्म घेतलेले हे कन्यारत्न जेष्ठ बंधू कांतीलाल, अभय आणि दिलीप व तसेच छोटी बहिण वंदना यांच्या बरोबर लहानाची मोठी होऊन पुणे येथे नातेवाईकांकडे शिक्षण घेतले. सन 1989 मध्ये कर्जत जिल्हा, अहमदनगर येथील स्व. शांतीलाल बलदोटा व स्व.सौ.कमलाबाई बलदोटा यांचे कनिष्ठ चि. राजेंद्र बलदोटा यांच्याशी विवाह झाला. अत्यंत नम्र स्वभावाने त्यांनी बलदोटा परिवाराची मने जिंकली. मोठे भाउजी अशोक व सुमती यांना वडील समान तर जाऊबाई सौ.रत्नप्रभा व सौ. सुशीलाताई यांच्याशी बहिनी प्रमाणे आदर सन्मानाने त्या सर्वांच्या प्रिय झाल्या.
खर्या अर्धांगिनी – राजेंद्र बलदोटा यांच्याशी 34 वर्षे पती परमेश्वर या नात्याने त्या जागल्या. दिवसरात्र पतीची सेवा करीत असताना पत्नीला अर्धांगिनी का म्हणतात याची अनुभूती ललिताताईंनी दिली. कोणत्याही वेळी मित्रा सारखे सतत पती राजेंद्र बरोबर त्या वावरत असत. पहाटे चालायला जायचे असो, शेतात जायचे असो की धार्मिक, किंवा मित्र नातेवाईकांचे कार्यक्रम असोत त्या सतत राजेंद्रजी यांची सावली बनून राहत असत. या सुखी संसारात त्यांच्या जीवनवेलीवर चि.ऍड.रोहित व चि.कु.प्रियांका ही दोन सुंदर संस्कारित फुले उमलली. त्यांना घडवण्याचे मोलाचे कार्य ललिताजिनी मोठ्या मायेने परिपूर्ण केले. सूनबाई सौ. प्राजक्ता हिला ही मुलीसमान वागणूक देऊन माहेरची आठवण होऊ दिली नाही. समाजातील दु:खी पिडीतांबाबत संवेदनशील बलदोटा परिवाराचा सामाजिक बांधिलकीचा वसा ललीताताईनी अचूक अंगीकारला. गरीब-श्रीमंत, उच्च-नीच्च हा भेद-भाव त्यांच्या आचरणातून कधीच जाणवला नाही. शेतमजुरांच्या मांडीला मांडी लावून त्यांच्या बरोबर भाजी-भाकर खाताना त्यांना कधी संकोच वाटला नाही. घरी आलेल्या आतिथीस कधीच विन्मुख जाऊ दिले नाही. त्यांना प्रेमआदराने अन्नपूर्णा माताही म्हणत. वाळुंज ता. नगर येथे शेतीच्या माध्यमातून जात असताना ग्रामस्थांच्या सुखंदु;खात सामील होणे, त्यांना काहीही लागले तरीही ते देणे, त्यांच्या दु;खद प्रसंगी गरिबांच्या घरी शिदोरी घेऊन जाणे, वारकर्यांच्या अन्नदान इ.अनेक आठवणी त्यांच्याबाबत आहेत. वाळुंज येथील ज्ञानदीप विद्यालयाच्या जडणघडणीत पती राजेन्द्रजी बलदोटा परिवाराच्या बरोबर अनेक उपक्रमात त्या सक्रिय असत. गरजू विद्यार्थ्यांना वह्या – पुस्तके गणवेश वाटप बरोबर गुणवंतांना प्रोत्साहन रोख पारितोषिक त्यांनी दिले. इनरव्हील कल्बच्या अध्यक्ष असताना वाळुंज व परिसरातील नागरिकांसाठी त्यांनी घेतलेले सर्वरोग निदान व उपचार शिबिर सदैव आठवणीत राहील….
स्व.सौ.ललिताताई राजेन्द्र बलदोटा मेमेरियल फाउंडेशन बालघर प्रकल्प
जे का रंजले गाजले त्याशी मन्हे जो अपुले, देव तेथेची जानावा तोची साधू ओळखावा
संत तुकोबास्यांच्या या अभंगाची प्रचिती स्व.सौ. ललिताताईच्या गोरगरीब एकल निराधार बालकांच्या उत्कर्षासाठीच्य्या तळमळीतून जाणवते. तपोवन रोड्याच्या विश्वस्त मित्रांनी समाजातील आदीवासी, भटक्या, विमुक्त, निराधार, अनाथ बालकांसाठी सुरू केलेला बालघर प्रकल्प स्व.सौ. ललिताताईंचे मातृत्व जागृत करून गेला. संवेदनशील, हळण्या स्वभावाच्या ललिताताईंचे अंतकरण या बालकांच्या उत्कर्षप्रती जोडले गेले होते. वेळोवेळी या प्रकल्पाला भेटी देऊन भोजनासह त्या निरागस बालकांना आनंदित करणे हा ललिताताईचा छंद होऊन बसला होता. म्हणूनच त्यांच्या अकाली आकस्मित जाण्याने या बालकांचे कृपाछत्र हरवले. यांची जाणीव ठेवून युवराज गुंड व त्यांचे सहकारी विश्वस्त मित्र यांनी कृतज्ञेपोटी कोणतीही अपेक्षा न ठेवता बालघर प्रकल्पास व संस्थेस स्व.सौ.ललिताताई राजेन्द्र बलदोटा मेमरीअल फाउंडेशन संचालित बालघर प्रकल्प असे नामकरण करून ताईंचे नाव अमर करण्याचा प्रयत्न केला आहे. ऍड. राजेंद्र बलदोटा व ऍड. रोहित बलदोटा आणि सर्वच बलदोटा परिवाराने स्व.सौ. ललिताताईंच्या स्मृती चिरंतर राहण्यासाठी बालघर प्रकल्पाच्या पाठीशी उभे राहण्याच्या संकल्प केला आहे. त्यामुळे स्व. ललिताताई आता ह्यात नसतानाही खर्या अर्थाने अनाथ निराधार बालकांच्या ’माई’ झाल्या आहेत…..माईंच्या स्मृतीस विनम्र अभिवादन
रोहकले सर,
मुख्याध्यापक ज्ञानदीप विद्यालय वाळूंज तालुका नगर