वरणगावात मुलींच्या मागे लागलाय टारगटांचा ससेमीरा

0
4

साईमत वरणगाव प्रतिनिधी

शहरात गेल्या काही दिवसांपासून टारगंटाचा उपद्रव चांगलाच वाढला असुन टारगंटाकडुन शालेय विद्यार्थींनीचा विनयभंग करण्याचे प्रकार वाढले आहेत . तर या प्रकरणी पोलीस ठाण्यात पिडीतांच्या तक्रारीवरून १५ दिवसांत तिन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत . यामुळे पोलीसांनी अशा टारगटांचा वेळीच बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

शहरातील महात्मा गांधी विद्यालय, नुतन मराठा महाविद्यालय ( सिध्देश्वर नगर ), गं. सां माध्यमिक अशा विद्यालयांमध्ये शहर व ग्रामीण भागातील असंख्य विद्यार्थींनी शालेय शिक्षण व खाजगी क्लासेससाठी येणे – जाणे करतात . यामुळे शालेय कालावधीत विद्यार्थी व विद्यार्थींनीचा मोठा राबता असतो . मात्र, याचाच काही टारगट ( रोडरोमिओ ) मुले गैरफायदा घेत शालेय विद्यार्थिंनीचा ससेमिरा ( पाठलाग ) करीत असल्याने शालेय विद्यार्थींनीमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे . याच प्रकारे गेल्या काही दिवसांपासून अल्पवयीन मुलींचा पाठलाग करून त्यांचेशी असभ्य पणाची वर्तवणूक करणाऱ्या पाच टारगट मुलांविरुद्ध वरणगांव पोलीस ठाण्यात पिडीत मुलींच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोस्कोतंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे . मात्र, असे असुनही काही टारगट मुले शाळा सुटण्याच्या वेळी शालेय परिसरात घिरट्या घालीत असल्याचे दिसून येत असल्याने पोलीस व शालेय प्रशासनाने त्यांच्यावर पाळत ठेवून योग्य ती कारवाई करण्याची मागणी पालक वर्गातुन होत आहे.

टारगंटाच्या हाती दुचाकी

शहरात गेल्या काही महिन्यांपासुन बहुतांश टारगट मुले दुचाकीने शाळा सुटण्याच्या वेळी आपल्या दुचाकीने शहराच्या मुख्य रस्त्यावर तसेच वसाहतीमध्ये घिरट्या मारतांना दिसुन येत आहेत . तसेच वेळ मिळताच मुलींशी असभ्य वर्तन करून त्यांचा विनयभंग करीत असल्याने अल्पवयीन शालेय विद्यार्थींनीमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे . यामुळे पोलीस प्रशासनाने टारगट व अल्पवयीन मुलांच्या हाती असलेल्या दुचाकी जप्त करण्याची मोहीम राबविण्यात यावी . तसेच शाळा सुटण्याच्या वेळी पोलीसांनी शालेय परिसर व शहराच्या मुख्य मार्गावर गस्त वाढवावी अशी मागणी पालकवर्ग सुज्ञ नागरीकांमधून होत आहे.

शहराला गालबोट लागण्याची शक्यता

शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून टारगट मुलांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला असुन मुलींमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे . तसेच काही मुलींना फुस लावुन पळवण्याच्या प्रकारात सुद्धा वाढ झाली असल्याने पोलीस प्रशासनाने अशा टारगट रोड रोमिओं विरुद्ध कठोरात कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे अन्यथा एखादेवेळेस शहरातील शांततेला गालबोट लागण्याची शक्यता नाकारता येत नाही .

दामिनी पथक होणार सक्रीय

शहरातील टारगंटाचा उपद्रव पाहता त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने दामिनी पथक सक्रीय करण्याचा निर्णय घेतला आहे . तसेच शहर व परिसरातील सर्व शाळांमध्ये तक्रार पेट्या लावण्यात आले असुन विद्यार्थींनीनी आपल्या तक्रारी त्या पेटीत टाकल्यास त्याची त्वरीत दखल घेतली जाईल . तसेच पालकानीही आपल्या पाल्यावरील कटु कारवाई टाळण्यासाठी लक्ष केंद्रित करावे अशी माहिती वरणगांव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिषकुमार आडसुळ यांनी दिली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here