घंटागाडी कामगारांसह कर्मचाऱ्यांचा सन्मान
साईमत/ जळगाव / प्रतिनिधी
शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी पहाटेपासून अविरत मेहनत करणाऱ्या सफाई कामगारांच्या योगदानाची दखल घेत कामगार दिनानिमित्त प्रभाग क्रमांक १६ मध्ये त्यांच्या सन्मानाचा हृदयस्पर्शी कार्यक्रम पार पडला. समाजातील अत्यंत महत्त्वाचा, परंतु अनेकदा दुर्लक्षित राहणाऱ्या या घटकाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा उपक्रम ठरला.
नगरसेविका तथा प्रभाग समिती सदस्या वंदना संतोष इंगळे यांच्या पुढाकारातून आयोजित या कार्यक्रमात प्रभागातील सफाई कर्मचारी व घंटागाडी कामगार अशा सुमारे ५० कामगारांचा पुष्पगुच्छ, भेटवस्तू, चटई तसेच नाश्ता व चहा देऊन सन्मान करण्यात आला. स्वतःच्या आरोग्याची पर्वा न करता शहराची स्वच्छता राखणाऱ्या या कर्मचाऱ्यांप्रती उपस्थितांनी मनःपूर्वक आदर व्यक्त केला.
अयोध्यानगर येथील उद्योजक संतोष इंगळे यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी नगरसेवक डॉ. विरेन खडके, सुनील खडके, प्रदीप रोटे, रंजना वानखेडे, बाळा सोनवणे, हर्षल मावळे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच मनपा मुख्य स्वच्छता निरीक्षक उमेश भालेराव, स्वच्छता निरीक्षक मयूर सपकाळे व त्यांच्या सहकाऱ्यांनीही सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाला वसंतराव महाजन, नंदू पाटील, नितीन नाईक, प्रशांत जाधव, प्रमोद वाणी, दिलीप चौधरी, हर्षल इंगळे, कमलेश महाजन, ज्ञानेश्वर पाटील, पवन इंगळे, मनोज निंबाळकर, समीर चौधरी, संदेश महाजन, सनी कोल्हे, परेश सोनवणे, लता कोल्हे, सुवर्णा नाईक, जयश्री अकोले, पाटील ताई, रेखा वाणी यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सत्कार करण्यात आलेल्या कामगारांनी या सन्मानाबद्दल समाधान व्यक्त करत, अशा उपक्रमांमुळे काम करण्याची प्रेरणा अधिक दृढ होत असल्याचे सांगितले. समाजाच्या आरोग्याशी निगडित असलेल्या या कार्याला योग्य मान्यता देण्याचा हा प्रयत्न कौतुकास्पद ठरत असून, भविष्यातही अशा उपक्रमांची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
