महिलांचे धाडस, कर्तृत्वाला सलाम… महिला गोविंदा पथकाने फोडली मानाची दहीहंडी

0
18

साईमत जळगाव प्रतिनिधी

ढोल ताशांचा गजर…शिवतांडवातुन शिवशक्ती जागर…अन् रोप व पोल मल्लखांबांची चित्तथरार प्रात्यक्षिके…त्याला मधुरभक्ती गितांची मैफलीची साथ.. आणि गोविंदा रे गोविंदा…जय घोष करत, महिलांचे एकावर एक मानवी मनोरे…व सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी ने महिलांचे धाडस, साहस, आत्मविश्वासाची प्रचिती जळगावकरांनी अनुभवली..
भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन तर्फे आयोजित तरूणींसाठी दहीहंडी उत्सवात एनसीसी, नुतन मराठा महाविद्यालय, विद्या इंग्लीश स्कूल यांना दहीहंडी फोडण्याचा मान मिळाला. यात एनसीसी, नुतन मराठा महाविद्यालय यांनी दहिहंडी फोडली. विशेष पालखीने कृष्ण भगवान साकारलेला चिमुकला अथांग अजय डोहळे सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.

काव्यरत्नावली चौकातील तरूणींची दहीहंडी प्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, पोलीस अधिक्षक मेघनाथन राजकुमार, आमदार राजूमामा भोळे, महापौर जयश्री महाजन, एनसीसीचे कमांडींग ऑफिसर कर्नल अभिजित महाजन, लेफ्टनंट कर्नल पवन कुमार,अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप गावित, प्र.डीवायएसपी सतिष कुलकर्णी, विकास पवार, जैन इरिगेशनचे अनिल जोशी, स्वरूप लुंकड, अशोक कावडीया, डॉ. कल्याणी गुट्टे, पारस राका, विराज कावडीया, राजेश नाईक उपस्थित होते.
दहीहंडी उत्सवाचे हे होते विशेष आकर्षण
विवेकानंद व्यायाम शाळेतर्फे मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. यासह शिवतांडव व शोर्यवीर या दोन्ही ढोलताशा पथकातील सुमारे २७५ ढोलताशा वादकांनी आपल्या कलाकृती सादर केली. मल्लखांब प्रशिक्षक नरेंद्र भोई यांच्या मार्गदर्शनात २० विद्यार्थ्यांनी रोप मल्लखांब, पोल मल्लखांब चे चित्तथरारक सादरीकरण करून जळगावकरांची मने जिंकली.
सांस्कृतिक नृत्यासह, राधा-कृष्ण वेषभुषा स्पर्धा
महिलांची दहिहंडीत अनुभूती शाळा, जी. एच. रायसोनी पब्लीक स्कुल, रूस्तमजी इंटरनॅशनल, किडस् गुरूकुल इंटरनॅशनल स्कूल, इपिक डान्स स्टुडिओ तर्फे सांस्कृतिक नृत्य सादर केले. ५ ते १२ वर्ष वयोगटातील बाळगोपाळांसाठी राधा-श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांचा उत्फूर्त सहभाग होता.
महोत्सवाच्या यशस्वितेसाठी युवाशक्ती फाऊंडेशनचे विराज कावडिया, दहीहंडी उत्सवाच्या अध्यक्षा संस्कृती नेवे, उपाध्यक्षा मेघना भोळे, यामिनी कुळकर्णी, सचिव पियुष तिवारी, सहसचिव हर्षल मुंडे, खजिनदार अर्जुन भारूळे, सागर सोनवणे, शुभम पुश्चा, प्रितम शिंदे, तृषांत तिवारी, पियुष हसवाल, प्रशांत वाणी, राहूल चव्हाण, पियुष तिवारी, यश राठोड यांच्यासह जैन इरिगेशन सिस्टीम लि.च्या सहका-यांनी परिश्रम घेतले.
‘त्या नाहीतर कोण…’ इस्रोच्या महिला शास्त्रज्ञांना सलाम
चांद्रयान-3 यशस्वी झाले. त्यात महिलांचे योगदान महत्त्वाचे होते. इस्रोच्या महिला शास्त्रज्ञ डॉ. रितु श्रीवास्तव, नंदिनी हरिनाथ, अनुराधा टि. के., मिनल रोहित, मऊ मिता दत्त, टेसी थॉमल्स, व्हि. आर. लली थांबिका, मुथ्या विनिथा यांच्या सन्मानार्थ ‘त्या नाहितर कोण..’ ही थिम घेऊन दहीहंडीत विशेष मानाचे स्थान देण्यात आले होते. चंद्राची प्रतीकृती साकारून महिलां शास्त्रज्ञाचे प्रेरणादायी छायाचित्रे सिता-यांमध्ये दाखविण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here