साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील पाडळसरे येथील युवा कार्यकर्ते सागर सुकदेव कोळी यांना राष्ट्रीय सेवा योजना तसेच युवक कल्याण क्षेत्रात केलेल्या कार्याचा सन्मानार्थ युवकमित्र परिवार संस्था पुणेमार्फत दिला जाणारा ‘स्वामी विवेकानंद युवा प्रेरणा पुरस्कार’ नुकताच प्रदान करण्यात आला.
राष्ट्रीय युवा दिनानिमित्त पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय युवा संमेलनात सागर कोळी यांना राज्याचे वनविभागाचे महावनसंरक्षक रंगनाथ नाईकडे, बुक क्लबचे संस्थापक अविनाश निमसे, मंथन फाउंडेशनच्या संस्थापिका आशाताई भट्ट, युवक मित्र परिवाराचे संस्थापक प्रवीण महाजन, बादलसिंग गिरासे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
सागर कोळी यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवून वंचित विकासाबरोबर लोककल्याणाचे कार्य करीत असतात. या कार्याची दखल पुरस्कारासाठी घेण्यात आल्याचे श्री.कोळी यांनी सांगितले. यावेळी सद्गुरू सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन म्हसे, अदिती निकम, बादलसिंग गिरासे, कार्तिक चव्हाण, मंगला नागुल यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.