साईमत अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथे खानदेश साहित्य संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला पारंपरिक आखाजी महोत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. अहिराणी संस्कृतीतील गौराई, झोक्यावरची गाणी, जात्यावरची गाणी यांसारख्या लोकपरंपरांना उजाळा देत या महोत्सवाने संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्याचा संदेश दिला.
खानदेशातील ही पहिलीच आखाजी महोत्सवाची भव्य आवृत्ती अमळनेरच्या एलआयसी कॉलनीत मोठ्या गर्दीत पार पडली. स्त्रियांच्या कला-कौशल्यांना व्यासपीठ मिळावे आणि जुन्या परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचाव्यात, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांनी या महोत्सवाला शासकीय पातळीवर मान्यता मिळावी, तसेच निधी उपलब्ध करून द्यावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. “अहिराणी संस्कृती जपणे ही आपली जबाबदारी आहे,” असे ते म्हणाले.
“अमळनेर सोडून ३८ वर्षे झाली तरी अहिराणीची गोडी कमी झालेली नाही,” असे भावनिक उद्गारही त्यांनी यावेळी काढले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्य संघाचे केंद्रीय अध्यक्ष प्रा. डॉ. सदाशिव सूर्यवंशी होते. आमदार अनिल पाटील यांनी महिलांनी परंपरा जपल्याबद्दल समाधान व्यक्त केले, तर माजी आमदार साहेबराव पाटील यांनी अहिराणी भाषेत केलेली फटकेबाजी उपस्थितांची दाद मिळवून गेली.
कार्यक्रमाला साहित्यिक, लोककलावंत, समाजसेवक आणि स्थानिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महोत्सवात पारंपरिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यात पुरणपोळी स्पर्धा, झोक्यावरची गाणी, उखाणे, वेशभूषा, आरास, घटयावरील गाणी आणि चित्रकला स्पर्धांचा समावेश होता.
पुरणपोळी स्पर्धेत प्रतिभा चौधरी यांनी प्रथम क्रमांक पटकावला. झोक्यावरच्या गाण्यांच्या स्पर्धेत मेघना पवार व दीपिका पाटील यांच्या जोडीने प्रथम क्रमांक मिळवला. उखाणे आणि वेशभूषा स्पर्धेत विजयाताई पाटील यांनी बाजी मारली. आरास स्पर्धेत जिजाऊ ग्रुपने प्रथम क्रमांक मिळवला.
गौराई, जात्यावरची गाणी, शाहीरांचे सादरीकरण आणि लोककला यामुळे संपूर्ण परिसरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते. परीक्षक म्हणून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी जबाबदारी पार पाडली.
यशस्वी आयोजनाचा ठसा
खानदेश साहित्य संघाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि आयोजन समितीने अथक मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला. सुत्रसंचालन संजय पाटील आणि पूनम बेडसे यांनी केले, तर आभार प्रदर्शन उमेश काटे यांनी मानले.
अहिराणी संस्कृतीला नवे व्यासपीठ मिळवून देणारा हा आखाजी महोत्सव अमळनेरच्या सांस्कृतिक इतिहासात एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.