बर्डे प्लॉट परिसरात मध्यरात्री घडलेल्या घटनेने खळबळ; चार ते पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
साईमत / बुलडाणा
बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात नाचताना झालेल्या किरकोळ धक्क्याच्या रागातून एका २३ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्यरात्री बर्डे प्लॉट परिसरात ही घटना घडल्याने संपूर्ण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बर्डे प्लॉट परिसरातील स्मशानभूमीजवळ एका लग्न समारंभात डीजे सुरू असताना अनेक तरुण नाचत होते. यावेळी शोएब खान अमीन खान (वय २३) याचा नाचताना एका व्यक्तीला धक्का लागला. या क्षुल्लक कारणावरून वाद निर्माण झाला आणि त्याचे रूपांतर काही क्षणांतच भीषण हल्ल्यात झाले.
चार ते पाच जणांच्या टोळक्याने शोएब खानवर धारदार शस्त्र तसेच फायटरने जीवघेणा हल्ला केला. हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला. आरोपींनी हल्ला सुरूच ठेवत त्याला ठार मारल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे सावट आहे. या प्रकरणी खामगाव पोलिसांनी संबंधित आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू आहे.
दरम्यान, अशाच प्रकारची घटना पुण्यातही घडली असून लग्नाच्या वरातीत झालेल्या वादातून एका तरुणाची हत्या करण्यात आली होती. त्यामुळे राज्यात वाढत्या हिंसक घटनांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
